गाझा सिटी – इस्रायलने गाझा पट्ट्यातील गाझा सिटी हे शहर युद्धभूमी म्हणून घोषित केले आहे. या भागात मानवतावादी मदत पोचवणे सुलभ व्हावे यासाठी दुपारच्यावेळी हल्ल्यांना पूर्वी जी स्थगिती दिली होती, ती आता इस्रायलने रद्द केली आहे. गेल्या महिन्यापासून सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत हल्ल्यांना स्थगिती इस्रायलने जाहीर केली होती. ही स्थगिती गाझा सिटी, देर अल-हलाह आणि मुवासे या भागांपुरती लागू होती. या भागातच हजारो पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला आहे. तेथील अन्नधान्याच्या टंचाईमुळे दुपारच्या हल्ल्यांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता इस्रायलने आपल्या व्यापक मोहिमेला प्रारंभ केल्याने ही स्थगिती रद्द करण्यात आली आहे. गाझा सिटीवर लष्करी नियंत्रण मिळवण्यासाठी इस्रायलने आपल्या राखीव सैन्याला सक्रिय केले आहे. गाझा सिटीमध्ये मदत पोचवणाऱ्या संस्थांना किंवा स्थानिक रहिवाशांना आपल्या हालचालींची पूर्वकल्पना दिली आहे का नाही, हे इस रायलकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच या भागातील मदत पुरवठा कधी पुन्हा पूर्ववत सुरू केला जाईल, याचीही माहिती इस्रायली सैन्याने दिलेली नाही. गाझा शहर हा हमासचा बालेकिल्ला आहे. तेथे हमासच्या बोगद्यांचे जाळे आहे. हे बोगदे मागील अनेक मोठ्या प्रमाणात केलेल्या हल्ल्यांनंतरही अतिरेक्यांकडून वापरात आहे, असे इस्रायलने पूर्वी म्हटले होते. पण जर इस्रायलने नियोजनाप्रमाणे आक्रमण केले तर वेढलेल्या पट्ट्यातील रुग्णालयातील बेड क्षमता निम्मी कमी होऊ शकते, असे संयुक्त राष्ट्रांनी गुरुवारी म्हटले आहे. गाझातील मृतांची संख्या ६३ हजारांवर – गाझामधील मृतांची संख्या ६३,०२५ वर पोहोचली आहे, असे गाझा आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. गाझा शहरात इस्रायलच्या विस्तारित हल्ल्याला सुरुवात होताच पॅलेस्टिनी लोकांनी मृतांची संख्या ६३,००० च्या पुढे गेली. मात्र यामध्ये हमासचे दहशतवादी किती आणि सामान्य नागरिक किती होते,याची वेगवेगळी आकडेवारी देण्यात आलेली नाही. हमासचे प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने ही आकडेवारी दिली गेली आहे.