Israel : इस्रायलकडून गाझातील 3 भागात युद्ध स्थगितीला प्रारंभ

गाझा सिटी : इस्रायली सैन्याकडून गाझामधील 3 भागांमधील हल्ले दिवसाला 10 तास स्थगित करण्याला आजपासून सुरुवात करण्यात आली. गाझामधील उपासमार रोखण्यासाठी विमानातून अन्नपदार्थ टाकण्याला देखील सुरुवात करण्यात आली आहे. दाट लोकवस्ती असलेल्या गाझा सिटी, देर अल-बलाह आणि मुवासी या भागांमध्ये सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत इस्रायल आपली लष्करी कारवाई स्थगित ठेवणार आहे. तसेच गाझाच्या हद्दीमध्ये मानवतावादी मदतीचा पुरवठा देखील वाढवण्यात येणार आहे. आठवड्याभरासाठी ही वाढीव मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
इस्रायलच्या या निर्णयाचे संयुक्त राष्ट्रांचे मानवतावादी कार्यक्रमाचे प्रमुख टॉम फ्लेचर यांनी स्वागत केले आहे. सर्वसामान्यांच्या हालचालींवर इस्रायलने घातलेले निर्बंध शिथील केल्याचे दिसत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही मार्गाने गेली तरी किमान आवश्यक तेवढी मानवतावादी मदत मिळू शकेल, यासाठी अनुमती द्यावी लागेल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. गाझामधील २ दशलक्ष पॅलेस्टिनींसाठीची मदत हमासकडून पळवून नेली जात असल्याने इस्रायलने या मदतीच्या पुरवठ्यावर निर्बंध घातले होते. मात्र हमासकडून मदत पळवून नेली जात असल्याचे पुरावे इस्रायलने दिले नव्हते.
तीन भागातील हल्ल्यांना जरी स्थगिती दिली असली, तरी इतर ठिकाणची कारवाई वाढवण्याचा इशाराही इस्रायलने दिला आहे. गाझातील इतर काही भागातील मदतीचा ओघ इस्रायलने कमी केला आहे. शनिवार संध्याकाळपासून रविवारपर्यंत इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये ४१ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. यात मदत केंद्राजवळ मदतीची वाट बघणाऱ्या २६ जणांचाही समावेश आहे. नव्याने मिळत असलेली मदत मिळवण्यासाठी आता लोक मदत केंद्राजवळ जायला घाबरू लागले आहेत. अन्नपदार्थांचे २८ बॉक्स गाझाच्या विविध भागांमध्ये विमानातून टाकण्यात आले असल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. मात्र विमानातून टाकण्यात येणारी अन्नपदार्थांचे बॉक्स आपल्या मुलांच्या अंगावर पडू नयेत, याचीही लोकांनी भीती वाटते आहे.





