बैरूत : दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्धच्या युद्धात इस्रायली लष्कराचेही मोठे नुकसान झाले आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार इस्त्रायलच्या लष्कराने अर्थात आयडीएफने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहसोबत झालेल्या चकमकीत आपला एक कमांडर आणि इतर 8 सैनिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. त्याचवेळी इस्रायलने जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळी इस्रायली सैन्याने मध्य बैरूतवर जोरदार बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात हिजबुल्लाचे किमान सहा सैनिक मारले गेले असून अन्य सात जण जखमी झाले आहेत. इस्रायलने बैरूतवर अचूक हवाई हल्ला केला असल्याचे सांगितले. बैरूतमधील बाचौरा भागातील संसदेजवळील इमारतीला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. याआधी इस्रायली लष्कराने ट्विटरवर शहीद झालेल्या सैनिकांची माहिती देत पोस्ट केली होती, हिजबुल्लाह विरुद्धच्या युद्धादरम्यान कॅप्टन इटान इत्झाक ओस्टर, कॅप्टन हारेल एटिंगर, कॅप्टन इटाई एरियल गिआट, सार्जंट फर्स्ट क्लास नोम बर्झिले, सार्जंट फर्स्ट क्लास या मंत्झुर, सार्जंट. फर्स्ट क्लास नझर इटकीन, स्टाफ सार्जंट आल्मकेन टेरेफे आणि स्टाफ सार्जंट इडो ब्रोअर हे शहीद झाले. मंगळवारी रात्री उशिरा इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात काही लोक जखमी झाले आहेत. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले होते की, इराणच्या दुष्ट अध्यक्षांविरुद्ध आम्ही कठीण युद्धाच्या मध्यभागी आहोत. ते आम्हाला नष्ट करू इच्छित आहेत मात्र ते अशक्य आहे. आम्ही एकत्र उभे आहोत आणि देवाच्या आशीर्वादाने आम्ही जिंकू. आम्ही इस्रायलच्या विजयाची हमी देतो. सोमवारी इस्त्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये प्रवेश केला होता.