कोलकाता – भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिक स्थलांतरितांवर होणाऱ्या कथित अत्याचारांविरुद्ध बुधवारी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निषेध मोर्चात सहभागी झाल्या. ममतांनी कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या एका विशाल पदयात्रेचे नेतृत्व केले. ममता यांच्यासोबत त्यांचे खासदार भाचे अभिषेक बॅनर्जी आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. पदयात्रेनंतर ममतांनी एका सभेला संबोधित केले. यावेळी ममतांनी भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि बंगालींवरील अत्याचार सहन करणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला. भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिक लोकांना बांगलादेशी आणि परदेशी म्हणत छळ केला जात आहे आणि तुरुंग आणि अटक छावण्यांमध्ये पाठवले जात आहे. बंगाल हा देशाचा भाग नाही का असा सवाल त्यांनी केला. तसेच इतर राज्यांमध्ये बसून बंगालच्या मतदारांची नावे वगळली जात आहेत असा दावा करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावर भाजपसाठी दलाली केल्याचा आरोप केला. देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे फक्त एकच भाषा बोलली जाते. याचा अर्थ असा नाही की त्या लोकांना तुरुंगात टाकावे. जेव्हा हिंदी भाषिकांना महाराष्ट्रातून हाकलून लावण्यात आले तेव्हा आम्हीच पहिला आवाज उठवला. आम्ही येथे राहणाऱ्या विविध राज्यांतील सर्व लोकांचा आदर करतो, मग ते कामगार असोत, व्यापारी असोत, दुकानदार असोत, फेरीवाले असोत किंवा कर्मचारी असोत. आम्ही त्यांच्यावर कधीही हल्ला करणार नाही कारण ते आपला आणि आपल्या देशाचा भाग आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. आम्ही प्रत्येक भाषेचा आदर करतो असे ममता म्हणाल्या.