Joanne Hicks Record : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोडला गेला ९४ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड! ५१ वर्षीय खेळाडूने केला ‘हा’ खास पराक्रम
Joanne Hicks Record : जोआन हिक्सने क्रिकेटच्या इतिहासातील ९४ वर्षे जुना विश्वविक्रम मोडला आहे.

Joanne Hicks Breaks 94 Year Old World Record 5 Wicket Haul At Age Of 51 : वयाच्या ज्या टप्प्यावर खेळाडू निवृत्ती स्वीकारून आरामात जीवन जगतात, त्या वयात एका महिला क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. अवघ्या एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आईल ऑफ मॅन (Isle of Man) देशाची फिरकीपटू जोआन हिक्सने (Joanne Hicks) ५१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ विकेट्स घेण्याचा अद्भूत पराक्रम केला आहे. यासह तिने पुरुष आणि महिला क्रिकेटच्या इतिहासातील ९४ वर्षे जुना विश्वविक्रम मोडला आहे.
४७ व्या वर्षी पदार्पण; आता ५१ व्या वर्षी रचला नवा इतिहास –
जोआन हिक्सने वयाच्या ४७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता ५१ वर्षे १७३ दिवस वय असताना तिने हा महापराक्रम केला. ग्रीस महिला संघाविरुद्धच्या टी-२० सामन्यात या अनुभवी उजव्या हाताच्या ऑफ-स्पिनरने अवघ्या १० धावांत ५ गडी बाद करत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एका डावात पाच विकेट्स घेण्याची तिची ही तिसरी वेळ ठरली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या बर्ट आयर्नमाँगर यांचा ९४ वर्षे जुना विक्रम मोडला –
Joanne Hicks, from Isle of Man🇮🇲, becomes the FIRST player (men/women) to take a five-wicket haul in international cricket after the age of 50.
Breaks a record that stood 96-years.
Previous oldest to take fifer:
Bert Ironmonger🇦🇺 (49Yrs 314D) vs England in 1932. pic.twitter.com/iwKXLgPz9l— Kausthub Gudipati (@kaustats) August 28, 2026
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (पुरुष व महिला दोन्ही प्रकारात) ५ विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू होण्याचा मान आता जोआन हिक्सच्या नावावर झाला आहे. तिने ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू बर्ट आयर्नमाँगर (Bert Ironmonger) यांचा १९३२ मधील विक्रम मोडला. आयर्नमाँगर यांनी ४९ वर्षे ३१४ दिवस वय असताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत ५ विकेट्स घेतले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाच्या ५० वर्षांनंतर ५ विकेट्स घेणारी हिक्स ही जगातील पहिलीच खेळाडू ठरली आहे.
ग्रीसचा ५२ धावांत खेळ खल्लास; आईल ऑफ मॅनचा ९ गडी राखून दणदणीत विजय –
जोआन हिक्सच्या भेदक माऱ्यासमोर ग्रीसच्या फलंदाजांनी अक्षरशः नांग्या टाकल्या. ग्रीसचा संपूर्ण संघ १५ षटकांत अवघ्या ५२ धावांत गारद झाला. विजयासाठी मिळालेले हे सोपे आव्हान आईल ऑफ मॅनच्या संघाने पॉवरप्लेमध्येच पूर्ण करत सामना ९ गडी राखून एकतर्फी जिंकला. जोआन हिक्सच्या या अविश्वसनीय कामगिरीमुळे जगभरातील क्रीडा विश्वातून तिच्या जिद्दीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





