आग्रा येथून आयएसआय एजंटला अटक; सोशल मिडीयाचा केला हुशारीने वापर

आग्रा : पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिस इन्टेलिजन्स अर्थात आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या फिरोजाबादच्या ऑर्डनन्स फॅक्टरीचा चार्ज मॅन रवींद्र कुमार याला एटीएस युनिटने आग्रा येथून अटक केली आहे. त्याच्या मोबाइलवरून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. रवींद्रने त्याच्या मोबाइलमध्ये नेहा नावाच्या आयएसआय हँडलर मुलीचा नंबर, त्याच्या सहकारी कर्मचाऱ्याच्या नावाने सेव्ह केला होता. त्यामुळे पत्नी किंवा घरातील इतर कोणत्याही कुटुंबातील सदस्याला कोणताही संशय येऊ नये.
रवींद्र कुमार याला फेसबुकवरील एका तरुणीच्या मदतीने आयएसआयने जाळ्यात अडकवले. नेहा शर्मा नावाच्या आयडीवरून फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीच्या काळात गोड गप्पा सुरू झाल्या. आधी हे संभाषण फेसबुक मेसेंजरवर होत असे. यानंतर, व्हॉट्स ॲप नंबर वापरून फोनवर संभाषण सुरू झाले.
हे संभाषण सुरु असताना, आयएसआय हँडलरने रवींद्रकडून गोपनीय माहिती घेण्यास सुरुवात केली. सध्या, कारखान्यात लष्कराशी संबंधित अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे, अनेक मोठी उपकरणे देखील तयार केली जात आहेत, अशा माहितीची देवाण-घेवाण होत होती. ज्या नंबरवरून संभाषण होत होते, तो नंबर गुप्तचर संस्थांच्या रडारवर होता. त्यामुळे व्हॉट्स ॲपवर पाठवलेली अनेक गोपनीय कागदपत्रे हटवण्यात आली होती. या प्रकरणी लखनौ एटीएस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता रवींद्र कुमारने नक्की किती गोपनीय माहिती आयएसआय एजंटला दिली, त्याचा तपास एटीएस करत आहे.





