Ishaan Sood Bowling : सेहवागच्या लेकाची चर्चा, पण खरा हिरो ठरला १७ वर्षांचा पठ्ठ्या! लेकासाठी वडिलांनी विकले शोरूम, ChatGPT वरून शिकवली बॉलिंग
Ishaan Sood Bowling IND vs AFG U19 Semifinal : अफगाणिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इशान सूदने उत्कृष्ट गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या.

Ishaan Sood U19 Asia Cup Wickets Father Sold Showroom ChatGPT Training Story : अंडर-१९ आशिया चषक २०२६ स्पर्धेत वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागच्या फलंदाजीची जोरदार चर्चा सुरू असतानाच, १७ वर्षीय युवा वेगवान गोलंदाज इशान सूदने आपल्या भेदक माऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उजव्या हाताच्या या गोलंदाजाने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक ४ सामन्यांत ११ विकेट्स घेतल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही त्याने सर्वाधिक ३ विकेट्स घेत अफगाणी संघाला ५० षटकांत २२७ धावांवर रोखण्यात मोलाचा वाटा उचलला.
उपांत्य फेरीत अफगाणिस्तानच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले –
अफगाणिस्तानविरुद्ध इशान सूदने अत्यंत मोक्याच्या क्षणी गडी बाद करत सामन्याचे चित्र पालटले. त्याने सलामीवीर अबिदुल्लाह नदराजनला अवघ्या १४ धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर मधल्या फळीत अर्धशतकी खेळी करत धोकादायक ठरणाऱ्या शाह फैसल रहीमीला (५१) इशानने क्लीन बोल्ड केले. डावाच्या अखेरच्या टप्प्यात त्याने मोहम्मद अलीलाही ८ धावांवर बोल्ड करत अफगाणिस्तानच्या मोठ्या धावसंख्येच्या आशांवर पाणी फेरले.
चारपैकी तीन सामन्यांत भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज –
Ishan Sood’s 3️⃣/43 and Aryan Savsani’s 2️⃣/29 lead India U19’s bowling effort in the semi-final 👏
Over to the batters to seal a place in the Final 🎯
Scorecard ▶️ https://t.co/mssnDLDhTk
#MensU19AsiaCup https://t.co/8oDdJtJ6AY
— BCCI (@BCCI) November 12, 2026
इशान सूदने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत चारपैकी तीन सामन्यांत भारताचा सर्वोत्तम गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. त्याने स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात नेपाळविरुद्ध अवघ्या १८ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला १ विकेट्स मिळाली; मात्र त्यानंतर युएईविरुद्ध त्याने ३७ धावांत ४ विकेट्स घेत प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली आणि उपांत्य फेरीतही आपली धार कायम राखली.
लेकाच्या स्वप्नासाठी वडिलांनी विकले शोरूम; गुगल अन् चॅटजीपीटीवरून घेतले धडे
SPEED THAT SPELLS TROUBLE! 😮💨
Ishaan Sood brings the heat with the ball!
#INDvAFG #AsiaCupU19 https://t.co/b4tMGZMGMZ
— CREX (@Crex_live) November 12, 2026
चंदीगडचा रहिवासी असलेल्या ६ फूट ४ इंच उंच इशानचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. दिग्गज ग्लेन मॅकग्राला आदर्श मानणाऱ्या इशानच्या मोठ्या भावाचे क्रिकेट करिअर दुखापतीमुळे अर्धवट राहिले होते. त्यानंतर वडील धीरज सूद यांनी इशानवर लक्ष केंद्रित केले. ईशान १३ वर्षांचा असताना वडिलांनी आपले कपड्यांचे शोरूम विकून पूर्ण वेळ त्याच्या प्रशिक्षणासाठी दिला. विशेष म्हणजे, या पिता-पुत्राने गुगल आणि चॅटजीपीटीच्या मदतीने अचूक लाईन-लेन्थ, यॉर्कर आणि आधुनिक गोलंदाजीचे तंत्र शिकून घेतले; आज त्यांच्या या मेहनतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळत आहे.





