Pune District : अनंतराव थोपटे यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी : प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रतिपादन
Pune District : एक ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे नुकसान झाले असून राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

भोर : “महाराष्ट्र राज्याच्या राजकीय कारकीर्दीत संघर्षमय जीवन जगत काँग्रेस पक्षाला बळकट करणारे आणि भोर-वेल्ह्याच्या मावळी जनतेचे लाडके लोकनेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यासारखा निष्ठावंत नेता महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पुन्हा होणे नाही. त्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व महान होते,” अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिवंगत अनंतराव थोपटे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
माजी मंत्री, स्वर्गीय अनंतराव थोपटे यांच्या तेराव्या विधीनिमित्त मंगळवारी (दि. १६) आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देविदास बन्साळी, जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण, सातारा जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले, पुणे जिल्हा परिषद सदस्या विक्रम खुटवड, जिल्हा बँक सदस्य भालचंद्र जगताप, पंचायत समिती सभापती मनीषा कंक, सदस्य सुषमा चव्हाण, गीतांजली आंबवले, राजेश बोडके, माजी सभापती लहूनाना शेलार, नितीन भरगुडे, सचिन मांडके, समीर घोडेकर यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले की, थोपटे साहेबांनी राजकारण बाजूला ठेवून कायम समाजकारणाला प्राधान्य दिले. एक ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे नुकसान झाले असून राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
सोनिया गांधी यांच्यासोबत तब्बल चार दशके काँग्रेस पक्षात अत्यंत निष्ठेने काम करत थोपटे साहेबांनी बहुजन समाजाचे खंबीर नेतृत्व केले. स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही न धावणारा हा मराठमोळा नेता होता. मंत्रिपदावर असताना त्यांनी भोर विधानसभा मतदारसंघासह उभ्या महाराष्ट्राच्या विकासाला मोठा हातभार लावला.
– हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.





