पिंपरी | महिलांवर अत्याचार होताना महायुतीचं सरकार झोपा काढतंय का ? – ज्योती निबांळकर

पिंपरी, (प्रतिनिधी) – दिवसाढवळ्या महिला, मुलींवर अत्याचार होत असताना महायुतीचं सरकार झोपा काढतंय का ?, बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे नराधम मोकाट आहेत.
दरवेळी तोंडसुख घेणा-या भाजपाच्या चित्रा वाघ कुठे गायब झाल्यात ?, आणि महिला आयोग तर खोक्यावर काम करणा-या सरकारचं रिल्स आयोग झाल्याची टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरद पवार)च्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर यांनी आंदोलनात केली.
महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर राज्य सराकर आणि गृह खात्याच्या भूमिकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पिंपरी चौकात तीन तोंडी प्रतिकात्मक रावण दहन करण्यात आले. यावेळी महिला अध्यक्षा निंबाळकर यांनी सरकारवर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रसेच कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, शहराचे प्रवक्ते माधव पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष विशाल जाधव,
विद्यार्थी अध्यक्ष राहुल आहेर, प्रदेश सचिव विश्रांती पाडाळे, व्यापार सेलच्या आशा भोसले, भोसरी विधानसभा अध्यक्ष सारिका हरगुडे, युवकचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे आदी सहभागी होते.
निंबाळकर म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
प्रत्यक्षात सरकारी आणि सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे, ती पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष नोंद होणाऱ्या तक्रारीवरून दिली आहे.
परंतु, नोंद होणाऱ्या घटनांपेक्षा समोर न येणा-या घटनांची संख्या जास्त आहे. स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे.
महिलांचा वापर केवळ मतदानासाठी करु नये. वेळ आल्यावर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांना हिसका दाखविल्या शिवाय राहणार नाही.





