Pune: दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी; बोपदेव घाट अत्याचार प्रकरण

पुणे – बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अटक आरोपी शोएब ऊर्फ अख्तर बाबू शेख व चंद्रकुमार कनोजिया यांच्या पोलीस कोठडीतील चौकशीचा अधिकार राखून ठेवत त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वानवडी येथील न्यायालयाने सुनावली.
आरोपींचा तिसरा साथीदार बाप्या गोसावी ऊर्फ सोमनाथ यादव ऊर्फ सूरज दशरथ गोसावी अद्याप सापडलेला नसून, त्याला अटक केल्यावर तिघा आरोपींच्या एकत्रित चौकशीसाठी अटक आरोपींच्या पोलीस कोठडीतील चौकशीचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. अटकरे यांनी हा आदेश दिला.
याप्रकरणी आरोपी शोएब ऊर्फ अख्तर बाबू शेख (वय २७, रा. आदर्शनगर, मंतरवाडी, उरुळी देवाची) आणि चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया (वय २०, रा. होलेवस्ती, उंड्री) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शोएबने स्वतःसह बाप्या गोसावीचे नाव खोटे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना पुन्हा पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
बोपदेव घाटात पीडितेवर अत्याचार करण्यापूर्वी आरोपी कोठून आले होते, तसेच गुन्हा केल्यानंतर ते कोठे थांबले होते, याची ठिकाणे शोएब व चंद्रकुमारने तपासादरम्यान पोलिसांना दाखविली. या ठिकाणांचा पंचनामा केला असून, चंद्रकुमारने गुन्हा करताना घातलेली चप्पल एकाने पोलिसांकडे आणून दिली आहे.
आरोपींचा तिसरा साथीदार बाप्या सापडल्यानंतर तिघांची एकत्रित चौकशी करून गुन्ह्याचा उलगडा करायचा आहे, तसेच साक्षीदारांकडे तपास करायचा आहे. त्यासाठी भारतीय न्याय संहितेच्या नवीन कलमांच्या आधार घेत आरोपींच्या पोलीस कोठडीचा अधिकार राखून ठेवत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात केली.





