Political Crisis : मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात? १८ आमदारांची गुप्त बैठक; ‘या’ मागण्यांवर निर्णय घेण्याची मागणी
Political Crisis : नाराज आमदारांच्या गटाने मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

Political Crisis : जम्मू-काश्मीरच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) पक्षात अंतर्गत नाराजी वाढली असून, मंत्रिमंडळातील फेरबदलावरून पक्षातील आमदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या नाराजीने आता उघडपणे डोके वर काढले असून, शुक्रवारी तब्बल १८ आमदारांनी एकत्र येत एक गुप्त बैठक पार पडली आहे. या बैठकीत पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
१८ आमदारांची बैठक, पक्षात खळबळ!
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगर एअरपोर्ट रोडवरील एका आमदाराच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे १७ आमदार आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश होता. मंत्रिमंडळ विस्तारानंतर निर्माण झालेली नाराजी आणि त्याविरोधात पुढील भूमिका काय असावी, यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, खासदार आगा रुहुल्ला मेहंदी यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी काही आमदार त्यांच्यासोबत जाण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
चार मंत्र्यांना हटवण्याची मागणी
नाराज आमदारांच्या गटाने मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा कार्यकाळ आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. मंत्रिमंडळात नवीन आमदारांना काम करण्याची संधी मिळावी, अशी या गटाची मुख्य मागणी आहे.
मंत्रिमंडळात बदलांसह प्रादेशिक संतुलनाची मागणी
नाराज आमदारांच्या गटाची मागणी केवळ मंत्र्यांना हटवण्यापुरती मर्यादित नाही. मंत्रिपदांचे वाटप गुणवत्तेच्या आधारावर व्हावे, जम्मू आणि काश्मीर या दोन्ही भागांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे आणि पक्षातील निर्णयप्रक्रियेत बदल व्हावेत, अशी त्यांची भूमिका आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या जवळच्या दोन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणीही या गटाकडून होत असल्याचे सांगितले जात आहे.
फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला काय भूमिका घेणार?
पक्षातील आमदारांची वाढती नाराजी आणि आगामी काळात बंडखोरीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वासमोर लवकर निर्णय घेणे महत्वाचे ठरणार आहे. या घडामोडींवर पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे नाराज आमदारांच्या गटाची दूर करण्यात पक्ष नेतृत्वाला यश मिळणार का की पक्षातील अंतर्गत नाराजी आणखी तीव्र होणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Jiya Shankar: ऑगस्टमध्ये साखरपुडा, ऑक्टोबरमध्ये नात्यात दुरावा? ‘वेड’ फेम जिया शंकरने सोडलं मौन!





