आरक्षण हा सामाजिक शाप ठरतोय का? – ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे

पुणे – आपल्या देशात आज लोकशाहीची घुसमट होते आहे. इतिहास बदलला जात आहे. धर्मांध वातावरण तयार केले जाते आहे. सहिष्णुता हा शब्द सामाजिक कोशातून नाहीसा होतो आहे का? एकेकाळी दुर्बल घटकांना योग्य न्याय, संधी मिळावी, या हेतूने निर्माण झालेल्या आरक्षणाचा आज विपर्यास झाला आहे. हे आरक्षण म्हणजे सामाजिक शाप ठरत आहे का? कधी नव्हे एवढी तेढ, एवढा दुजाभाव आढळत आहे, अशी परखड भूमिका ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी रविवारी व्यक्त केली.
अमोल पालेकर यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मधुश्री पब्लिकेशन्सच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘ऐवज’ या मराठी आत्मकथनपर पुस्तकाचे, तसेच ‘व्ह्यूफाइंडर’ या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन सई परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘दुर्दैवाने मराठी आणि गुजराती रंगभूमी सेन्साॅरच्या कात्रीत सापडली आहे. अनेक चांगल्या कलाकृती रंगमचावर येण्यावर बंधने येत आहेत.
मात्र, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची तसदी लेखक, निर्माता, दिग्दर्शक असे संबंधित लोकच घेतात. प्रेक्षकवर्गाने केवळ बघ्याची भूमिका न घेता कणखर आवाजाने सेन्सॉर बोर्डविरोधी चळवळीला पाठिंबा दिला, तर निश्चित श्रेष्ठींना दखल घ्यावी लागेल. जाहीर सभांमधील भडकावू भाषणे, प्रक्षोभक पुस्तकांमधील प्रचार, कशावरही बंधने नाहीत, मग मराठी आणि गुजराती नाटकांनी काय घोडे मारले आहे, असा सवाल परांजपे यांनी या वेळी उपस्थित केला.
चित्रपटसृष्टीमध्ये राहूनही अमोल कधी फिल्मी झाला नाही. पुरस्कार न घेणे हाच बंडखोर अमोल पालेकर यांचा विजय आहे, असे परांजपे म्हणाल्या. या प्रकाशनाच्या निमित्ताने कवी बालाजी सुतार यांनी पालेकर यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी आपला जे. जे. कला महाविद्यालय नट ते दिग्दर्शक असा प्रवास सांगितला. संध्या गोखले यांनी आभार मानले. प्रकाशक शरद अष्टेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. विभावरी देशपांडे यांनी मराठी आत्मकथनातील काही भागांचे वाचन केले. मीनाक्षी ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.
“तीन चित्रपटांमधील नायकाच्या भूमिकेनंतरही यशाची गुरुकिल्ली मला कधी लोभस वाटली नाही. पैसे मिळवण्यासाठीच काम करायचे, तर व्यावसायिक नाटकात काम केले असते. मात्र, त्या पलीकडे जाऊन काही नवे शोधण्याची आस माझ्यातील कलावंताला स्वस्थ बसू देत नव्हती. जोखीम पत्करण्याची वाट माझ्या आवडीची ठरली” – अमोल पालेकर, अभिनेते





