राज ठाकरेंचं मन भिरभिरतंय? कधी फडणवीस, तर कधी उद्धव ठाकरे, आता राहुल गांधी, पुढचं पाऊल कोणत्या दिशेने?

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अप्रत्याशित राजकीय खेळींनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंसोबत जवळीक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीगाठी आणि आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपांना पाठिंबा.
राज ठाकरे यांच्या या तिहेरी चालींमुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचं पुढचं पाऊल कोणत्या दिशेने पडणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
मराठी अस्मितेच्या नावाखाली ठाकरे बंधूंचा मेळ
18 वर्षांच्या दुराव्यानंतर राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीच्या प्रस्तावाला विरोध करत दोन्ही नेत्यांनी ‘आवाज मराठीचा’ मेळावा आयोजित केला.
27 जुलै 2025 रोजी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे ‘मातोश्री’वर शुभेच्छा देण्यासाठी गेले, तेव्हा मनसे आणि शिवसेना (UBT) यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना बळ मिळालं. या मेळाव्याने आणि भेटीने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवतील, अशी अपेक्षा निर्माण झाली. मात्र, त्यानंतरच्या घडामोडींनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
बेस्ट निवडणुकीत पराभव अन् फडणवीस भेटीने संभ्रम
मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना यांनी एकत्रितपणे लढत दिली, पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. या पराभवानंतर राज ठाकरे यांनी 21 ऑगस्ट रोजी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. ही भेट मुंबईतील वाहतूक आणि शहर नियोजनाच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मात्र, उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या चर्चा सुरू असताना फडणवीस यांच्याशी भेट घेणं हा राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा संदेश मानला गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीला राजकीय अर्थ नसल्याचं सांगितलं असलं, तरी मनसे आणि भाजप यांच्यातील जवळीकीच्या शक्यतेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीमुळे उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
राहुल गांधींच्या सुरात सूर
राज ठाकरे यांनी अलीकडेच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मत चोरीच्या मुद्द्यावर भाष्य करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांना पाठिंबा दर्शवला. “मी तर केव्हापासून सांगतोय, आपली मतं चोरली जात आहेत. भलती मतं आत टाकली जातात आणि आपल्याला सतत पराभवाला सामोरं जावं लागत आहे. निवडणुकीवर बहिष्कार टाकला असता, तर ती जागतिक बातमी झाली असती,” असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.
या वक्तव्याने राज ठाकरे आणि काँग्रेस यांच्यातील जवळीक वाढत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः, उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट 2025 मध्ये दिल्लीत राहुल गांधी यांच्यासोबत भेट घेऊन मनसे युतीचा प्रस्ताव मांडल्याच्या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांचं हे वक्तव्य अधिक अर्थपूर्ण ठरतं. यामुळे राज ठाकरे इंडिया आघाडीच्या जवळ जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
राज ठाकरेंचं पुढचं राजकीय पाऊल काय?
राज ठाकरे यांच्या या तिहेरी खेळीने उद्धव ठाकरेंसोबत मराठी अस्मितेचा नारा, फडणवीसांशी जवळीक आणि राहुल गांधी यांच्या मुद्द्याला पाठिंबा. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात संभ्रम निर्माण झाला आहे. मनसेला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी मुंबई, ठाणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवली येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांचं राजकीय वजन महत्त्वाचं ठरू शकतं.
त्यांच्या या डॅशिंग आणि अप्रत्याशित चालींमुळे ते कोणत्या गटासोबत हातमिळवणी करतील. शिवसेना (UBT) सोबत युती, भाजपशी जवळीक की इंडिया आघाडीत प्रवेश हा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र, त्यांच्या सध्याच्या हालचालींनी ते पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.





