युतीच्या घोषणेसाठी दसऱ्याचा मुहूर्त? संजय राऊतांचं सूचक विधान; शिवाजी पार्कवर ‘ठाकरे बंधूं’चा आवाज घुमणार?

Sanjay Raut : येत्या २ अॅाक्टोबर रोजी मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान निश्चित करण्यात आले असून, या ठिकाणी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेचा देखील दसरा मेळावा पार पडणार असून, आझाद मैदानावऐवजी जागा बदल्याची शक्यता आहे. मात्र, पक्षाच्या वतीने कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा अधिक होत आहे, याचं कारणं म्हणजे ‘ठाकरे बंधू’. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तसे संकेत देणारे वक्तव्य केले आहे. दसऱ्याला वैचारिक विचारांचे आदान प्रदान होऊ शकतं, असं सूचक विधान राऊतांनी केले आहे. आमचा संघाचा दसरा मेळावा नाही, असा टोला लगावत एक परंपरा आहे. दसरा मेळाव्याची आमची. शिवसेनेची परंपरा कधीही खंडित होत नाही, असे राऊत म्हणाले.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊतांनी सूचक प्रतिक्रिया दिली. चर्चा आहे, चांगली चर्चा आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. दसऱ्याला वैचारिक विचारांचे आदान प्रदान होऊ शकतं. आमचा संघाचा दसरा मेळावा नाही. एक परंपरा आहे दसरा मेळाव्याची आमची. शिवसेनेची परंपरा कधीही खंडित होत नाही. असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेवर घणाघाती टीका
शिंदेंच्या शिवसेनचा दसरा मेळावा देखील मुंबईत पार पडणार असून, यावर राऊतांनी भाष्य करत शिंदे यांचा दसरा मेळावा हा त्यांनी सुरत किंवा अहमदाबादला घ्यावा. जय शहा यांना त्यांनी बोलवावं, असा खोचक टोला लगावला. बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेऊन मीच बाळासाहेब एवढा दाखवायचं बाकी आहे, अशी घणाघाती टीकाही संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
हेही वाचा : Skin Care: घरगुती उपायांनी पिंपल्सवर होईल नियंत्रण, जाणून घ्या कसे करावे उपयोग





