Devendra Fadnavis | Raju Shetty – देवेंद्र फडणवीस ज्यावेळी 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी मी साखर कारखाने काटा कसे मारतात याचे पुरावे दिले होते. कारखाने कसे विकतात? याचे पुरावे दिले होते. पण त्यांनी सगळे पुरावे किरीट सोमय्यांना दिले. त्यानंतर त्यांनी सर्व साखर कारखानदारांनाच भाजपमध्ये घेतले. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहे की ब्लॅकमेलर आहे, असा सवाल करत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हल्लाबोल केला. जयसिंगपूरमध्ये आयोजित केलेल्या 24 व्या ऊस परिषदेत ते बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले, काटा मारी थांबवा, हे गेल्या 10 वर्षापासून आम्ही ओरडत आहे. पाच हजाराने चालणारा कारखाना जर 10 टक्क्यांनी काटा मारायला लागला तर दररोज 500 टन काटा मारला जातो. 500 टनाचे 3 हजार धरले तर दररोज साखर कारखाने 15 लाख रुपये काळा पैसा कारखानदारांच्या खिशात जात असल्याचे शेट्टी म्हणाले. काटा मारीतून एका वर्षाला नवीन एक साखर कारखाना तयार होऊ शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणात काटामारी केली जाते. पेट्रोल पंपावर काटा मारला तर लगेच सॉफ्टवेअरने कळतं, तशीच यंत्रणा तयार केली तर काटामारी सहज रोखू शकतात, असे शेट्टी म्हणाले. मग देवाभाऊ तुमचा हात कुणी धरला आहे? असा सवाल शेट्टींनी केला. कोल्हापूरमध्ये गेल्या अनेक वर्षे काटामारी रोखणारी यंत्रणा धूळखात पडली आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना सांगतो ती यंत्रणा भंगारात काढून टाका. उसाला यावेळी तुरे येणार आहेत. ऊस तोडायला पैसे देऊ नका, 20 जानेवारीच्या आत हंगाम संपणार आहे. त्यामुळे ऊस घालवायला गडबड करू नका, घरात शोधत येणार आहेत तुमचा ऊस तोडायचा का म्हणून. आम्ही ऊस तोड मजुरांच्या पैसे वाढीला विरोध केला आहे का? उलट आम्ही पाठींबा दिला आहे. तर मग ऊस तोडणाऱ्यांना पैसे द्यायची काय गरज आहे, असे शेट्टी म्हणाले.