Iron shed collapse: माणकिवलीत भीषण दुर्घटना! १०० फूट उंचीवरून लोखंडी शेड कोसळले; एकाचा मृत्यू, ८ जण गंभीर
Iron shed collapse: कस्तुरी लॉजिस्टिक्स वेअरहाऊसच्या बांधकामावेळी १०० फूट उंचीवरील शेड पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले; आठ जणांची प्रकृती चिंताजनक.

Iron shed collapse- माणकिवली गावाजवळ एका खासगी वेअरहाऊसच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सुमारे १०० फूट उंचीवरील लोखंडी मेटल शेड अचानक कोसळले. ही दुर्घटना मंगळवारी (दि. १३) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत शेडवर काम करणारे सुमारे २५ कामगार अडकले. त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला असून अनेक कामगार जखमी झाले आहेत. त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी जाखोटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माणकिवली गावाजवळ सुमारे ४० एकर परिसरात कस्तुरी लॉजिस्टिक्स वेअरहाऊसचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी पुण्यातील गौरव इंजिनिअरकडून लोखंडी शेड उभारण्याचे काम सुरू होते. बुधवारी सकाळी शेडवर सुमारे २५ कामगार फिटिंगचे काम करीत होते, तर शेडखाली ३० ते ४० कामगार काम करत होते. अचानक लोखंडी शेड पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याने शेडवर काम करणारे कामगार त्याखाली अडकले.
शेडखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढून खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. सुभाष यादव यांच्या डोक्यावर आणि मानेवर लोखंडी भाग पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनिकेत यादव, सुभाष शहाणे,
जसवंत कुमार, अरमान अन्सारी, रमेश साहू, अंदाज यादव, मनीष सागर, गुड्डू खान, सुनील राऊत, रमेश सावंत, जाखीर अन्सारी, सौरभ प्रजापती, हरी ओम आणि सोनू कुमार यांच्यासह अनेक कामगार जखमी झाले आहेत. लोखंडी शेड कोसळल्याने घटनास्थळी असलेल्या क्रेन, डंपर आणि रोलर यांचेही मोठे नुकसान झाले आहे.




