Pimpri | लोहगडाला मिळावा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा

मावळ, – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शिवकालीन बारा गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा, असा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला पाठविला आहे. त्यात मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचा समावेश असल्याने मावळवासीयांनी आनंद व्यक्त केला आहे.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी भारतातर्फे २०२४-२५ साठी सादर होणाऱ्या प्रस्तावात महाराष्ट्रातले नऊ गिरीदुर्ग व तीन जलदुर्ग अशा बारा गडकोटांना नामांकन देण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यांनी केलेला पराक्रम, लष्करीदृष्ट्या केलेली गडकोटांची बांधणी याची दखल आता जागतिक स्तरावर घेतली जावी यासाठी केंद्राने एक पाऊल पुढे टाकले आहे.
मावळ तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचा म्हणजे लोहगड किल्ल्याचा समावेश या नामांकनात केला आहे. त्यामुळे लोहगडला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त होईल. लोहगड किल्ला व परिसराचा प्रचंड कायापालट होईल. जगभरातून पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी येतील. नवीन नवीन प्रकल्प या ठिकाणी येतील. मावळचे प्रमुख पर्यटन केंद्र लोहगड होईल. त्यामुळे स्थानिक रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल व पर्यायाने या परिसराचा विकास होईल.
एकूण १२ गडकोटांना नामांकन
जागतिक वारसा स्थळाच्या नामांकनासाठी शिवछत्रपतींचे जन्मस्थळ शिवनेरीसह, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, द्वितीय राजधानी रायगडसह साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग त्याचबरोबर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे.
लोहगडचा किल्ल्याचा इतिहास
पुरंदरच्या तहामध्ये मोघलांकडे हा किल्ला गेला होता. सूरतची संपत्ती या ठिकाणी ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावर नेताजी पालकर, कान्होजी आंग्रे यांचे काही काळ वास्तव्य होते. पेशवे काळात नाना फडणवीस यांचेही या किल्ल्यावर वास्तव्य होते. गडावर सोळा कोन असलेला तलाव, शिवमंदिर आहे. गडाला पाच दरवाजे आहेत. विंचू कडामाची, जिथे सुरतची संपत्ती ठेवली होती अशी लक्ष्मी कोठी, भक्कम बुरुंज, तटबंदी, सुंदर अशा पायऱ्या तसेच गड परिसरामध्ये समोर असलेले तुंग, तिकोना व विसापूर हे किल्ले. जवळची पवना नदी व पवना धरण हे देखील गडाच्या वैभवात भर घालते.
जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यास…
लोहगडास जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यास येथील दळणवळण पूर्णपणे सुधारले जाईल. लोहगडास येणारे तिन्ही रस्ते मोठे होतील. मळवली मार्गे, दुधीवरे खिंडी मार्गे, पवनानगर वरून भातराशी मार्गे त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल. हे सर्व रस्ते शासनाला प्रशस्त करावे लागतील. त्याचबरोबर मळवली इथून जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग याला हा रस्ता जोडल्यास पुण्या मुंबईच्या पर्यटकांसाठी सुवर्णसंधी असेल. पर्यटक आले की हॉटेल व्यवसाय, ट्रान्सपोर्ट व्यवसाय याची मोठ्या वाढ होईल. ग्रामस्थांना रोजी रोटी उपलब्ध होईल. मळवली रेल्वे स्टेशन हे मोठे जंक्शन झाल्यास एक्सप्रेस या ठिकाणी थांबतील व आणखीन विकास होईल.
प्रतिक्रिया
लोहगड विसापूर विकास मंच गेली २५ वर्षे या ठिकाणी काम करत आहे. लोहगड विसापूर किल्ल्यांचा विकास हेच मंचाचे प्रमुख ध्येय आहे. लोहगड पायथ्याला शिवस्मारक बांधले आहे. त्याच्याभोवती भव्य शिवसृष्टी उभी करायची आहे. या ठिकाणी येणाऱ्या जगभरातील पर्यटकांना शिवरायांचा पराक्रमी इतिहास पाहता आला पाहिजे.
– सचिन टेकवडे, लोहगड विसापूर विकास मंच





