Irfan Pathan Revealed : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने एका मुलाखतीत सनसनाटी खुलासा केला आहे. 2009 मध्ये त्याला वनडे संघातून बाहेर करण्यात तत्कालीन कर्णधार एमएस धोनी याचा हात होता, असे त्याने स्पष्ट केले. इरफानने सांगितले की, त्याने तत्कालीन प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले होते, परंतु त्यांना स्पष्ट कारण सांगण्यात आले नाही. कर्स्टन यांनी फक्त इतकेच सांगितले की, काही गोष्टी त्यांच्या हातात नाहीत. इरफान 2009 नंतर फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकल नाही. 2011 च्या अखेरीस त्याचे पुनरागमन झाले आणि 2012 मध्ये त्यानी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत खुलासा – इरफान पठाणने ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या मनात दशकांपासून दडलेले सत्य उघड केले. त्यानी सांगितले की, कर्णधार एमएस धोनीच्या निर्णयामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले. इरफान म्हणाला, “2009 ची गोष्ट आहे. आम्ही न्यूझीलंडमध्ये होतो. त्याआधी मी आणि माझा भाऊ युसूफ पठाण यांनी श्रीलंकेत एक सामना जिंकला होता. त्या सामन्यात आम्ही अशा परिस्थितीतून विजय मिळवला होता, जिथे कोणत्याही खेळाडूने विजय मिळवून दिला असता तर त्याला वर्षभर तरी संघातून बाहेर केले नसते. त्याची जागा पक्की झाली असती, कारण तो मॅचविनर खेळाडू ठरला असता.” श्रीलंकेतील सामन्याचा केला उल्लेख – इरफानने पुढे सांगितले, “श्रीलंकेत आम्हाला 60 धावांची गरज होती आणि 28-29 चेंडू बाकी होते, पण 7 विकेट्स पडल्या होत्या. अशा परिस्थितीत सामना जवळपास संपला असे वाटत होते. आम्ही श्रीलंकेत, त्यांच्या भूमीवर खेळत होतो. समोर मलिंगा सारखे गोलंदाज आणि उत्तम फिरकीपटू होते. तरीही मी आणि माझ्या भावाने मिळून तो सामना जिंकवला. मी 16 चेंडूत 33 धावा केल्या आणि विकेट्सही घेतल्या. पण त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर गेल्यावर मला पहिल्या सामन्यातून बाहेर करण्यात आले. दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा सामना सुरू झाला तरी मी संघात नव्हतो. मला प्रश्न पडला की हे का होत आहे?” हेही वाचा – Virat Kohli : विराट-अनुष्काचा लंडनच्या रस्त्यावरील VIDEO व्हायरल, ‘सामान्य जीवनाचा’ घेत आहे आनंद गॅरी कर्स्टन यांना विचारलं कारण- इरफानने पुढे सांगितले की, त्याने प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्याशी याबाबत चर्चा केली. “मी गॅरी सरांना विचारले की, मला बाहेर ठेवण्याचे कारण काय आहे? मला काही सुधारणा करायची असेल तर सांगा, मी मेहनत करेन. पण मला कारण जाणून घ्यायचे आहे. त्यावर त्यांनी सांगितले, ‘इरफान, काही गोष्टी माझ्या हातात नाहीत.’ मी विचारले, मग त्या कोणाच्या हातात आहेत? त्यांनी सांगितले की ते मला सांगू शकत नाहीत.” हेही वाचा – Shreyas Iyer : श्रेयस अय्यरच्या आशिया कप निवडीवर चर्चा तापली, आकाश चोप्रा काय म्हणाले? जाणून घ्या कर्णधार धोनीच्या निर्णयावर भाष्य – मुलाखतकाराने जेव्हा विचारले की, मग कोणाच्या हातात गोष्टी होत्या, तेव्हा इरफान पठाण म्हणाला, “प्लेइंग इलेव्हन ठरवण्यात कर्णधाराची इच्छा असते. कर्णधार, प्रशिक्षक आणि व्यवस्थापन मिळून कोणते संयोजन निवडायचे हे ठरवतात. त्या वेळी कर्णधार एमएस धोनी होता. त्याचा निर्णय योग्य होता की अयोग्य, यावर मी भाष्य करणार नाही. प्रत्येक कर्णधाराला आपल्या पद्धतीने संघ चालवायचा असतो.”