Virat Kohli Praises : कॅप्टन बदलले पण किंग तोच! विराटच्या ८५ व्या शतकानंतर इरफान पठाणचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘कोहली म्हणजे…’

Virat Kohli Praises by Irfan Pathan : भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या बॅटने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जरी भारताचा पराभव झाला असला, तरी विराटने आपल्या वैयक्तिक कामगिरीने नवा इतिहास रचला आहे. या ३७ वर्षीय फलंदाजाच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने त्याचे तोंडभरून कौतुक केले असून एक महत्त्वाचे सत्य जगासमोर मांडले आहे.
विराटची वादळी खेळी आणि ५४ वे शतक –
इंदूरमध्ये ३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने १०८ चेंडूत १२४ धावांची जबरदस्त खेळी केली. यामध्ये १० चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. हे विराटच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ५४ वे आणि एकूण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८५ वे शतक ठरले. दुर्दैवाने, दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने भारताला ४१ धावांनी हा सामना गमवावा लागला.
इरफान पठाणने मांडले ‘खरे’ सत्य –
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना इरफान पठाण म्हणाला, “२०१३ मध्ये मी खेळत होतो तेव्हा लोक विचारायचे की भारताचा सर्वोत्तम फलंदाज कोण? तेव्हा उत्तर मिळायचे- कोहली! २०१६ मध्येही तोच उत्तर होते आणि १० वर्षांनंतर आज २०२६ मध्येही उत्तर तेच आहे- कोहली! काळ बदलला, वर्ष सरली पण कोहलीची महानता बदलली नाही.”
इरफानने पुढे नमूद केले की, “कोहलीने केवळ स्वतःच्या किंवा रोहितच्या कप्तानीमध्येच धावा केल्या नाहीत, तर त्याने एम.एस. धोनीपासून ते आताच्या तरुण शुबमन गिलपर्यंत प्रत्येक कर्णधाराच्या काळात धावांची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे.”
फिटनेसचे रहस्य: ‘रिपीट मोड’वर धावा –
विराटच्या फिटनेसचे कौतुक करताना इरफान म्हणाला की, ३७ व्या वर्षीही विराटच्या फिटनेसमध्ये तसूभरही फरक पडलेला नाही. तो एखाद्या रन मशीनप्रमाणे ‘रिपीट मोड’वर धावा करत आहे. मधल्या काळात फारसे सामने खेळायला मिळत नसले, तरी जेव्हा तो मैदानात उतरतो तेव्हा पूर्ण तयारीत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत विराट आता सचिन तेंडुलकरच्या (३४,३५७ धावा) विक्रमाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. विराटच्या नावावर सध्या २८,२१५ धावा जमा आहेत.





