#IREvIND : भारतीय संघ आयर्लंड मालिकेसाठी सज्ज ; पंड्याच्या नेतृत्त्वात आज पहिला टी-20 सामना

आयर्लंड – भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचे प्रथमच नेतृत्त्व करणा-या हार्दिक पंड्याकडे सर्वांचे लक्ष असणार असून संघातील युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे.
भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. यामुळे या मालिकेमध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत इंग्लंडमध्ये असल्यामुळे सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांचे संघातील स्थान जवळपास निश्चित आहे. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे आयपीएलचे काही सामने आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका खेळू शकला नव्हता. दुसरीकडे संजू सॅमसनसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची ही शेवटची संधी असेल.
संजू सॅमसनऐवजी दीपक हुड्डाचा पर्याय उपलब्ध आहे. दीपक हुड्डा फलंदाजीसह गोलंदाजीही करू शकतो. तसेच राहुल त्रिपाठीही टीममध्ये आहे. ऋतुराज गायकवाडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करण्यात यश आले नाही. असे असले तरी आयर्लंडविरुद्धच्या त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळू शकते.
भारतीय संघ- हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
इशान किशनने मागच्या वर्षभरात टी-20 क्रिकेटमधील भारतीय संघातील स्वत:चं स्थान निश्चित केले आहे. या मालिकेसाठी कर्णधार असलेला हार्दिक पंड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचव्या क्रमांकावर खेळला होता. या सीरिजमध्येही पंड्या त्याच क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे.
तर दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला येईल. आयपीएलमध्ये धमाका करणाऱ्या उमरान मलिक आणि अर्शदीप सिंगला संधी मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. तर भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान, अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल हे संघात कायम राहतील.





