#IREvIND 3rd T20 : तिसरा सामना पावसामुळे रद्द, टीम इंडियाचा 2-0 ने मालिका विजय

India vs Ireland T20 Series 2023 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन T20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना बुधवारी (23 ऑगस्ट) डब्लिन येथे पावसामुळे रद्द करण्यात आला. संततधार पावसामुळे टॉसही होऊ शकला नाही आणि टीम इंडियाने मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली.
भारत आणि आयर्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना बुधवारी डब्लिनमध्ये एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने आयर्लंडचा 33 धावांनी पराभव केला होता आणि या विजयासह मालिका 2-0 अशी जिंकली होती. तसेच भारताने मालिकेतील पहिला सामना डकवर्थ लुईस पद्धतीने दोन धावांनी जिंकला होता. त्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला.
अंतिम सामन्यातील टॉसला पावसामुळे उशिर झाला आणि अनेक तपासणीनंतर पंचांनी निर्धारित वेळेच्या तीन तासांनी सामना रद्द केला.
या मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर प्रभावी पुनरागमन केले. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घरच्या मैदानावर होणाऱ्या विश्वचषकापूर्वी वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत, बुमराहने तरुणांनी भरलेल्या संघाचे यशस्वी नेतृत्व केले आणि पहिली मालिका जिंकली.
दरम्यान, टीम इंडियाला क्लीन स्वीप करण्याची संधी होती, पण पावसामुळे तिसरा सामना होऊ शकला नाही. पहिल्या आणि दुसऱ्या टी-20मध्ये भारताने यजमानांचा पराभव केला होता. भारताने याआधी 2018 आणि 2022 मध्येही आयर्लंडला मालिकेत हरवले होते.






