#IREvIND 2nd T20 : भारताचा आयर्लंडवर 33 धावांनी विजय, मालिकेेतही 2-0 ने आघाडी

#IREvIND 2nd T20 Match : भारतीय संघ आणि आयर्लंड (Ireland vs India) यांच्यात 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना डब्लिन येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्याची मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. रिंकू सिंह सामन्याचा मानकरी ठरला. मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी, 23 ऑगस्ट रोजी होणार आहे.
भारताने दिलेल्या 186 धावांचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघास 20 षटकात 8 बाद 152 धावाच करत आल्या. आयर्लंड कडूून एंड्रयू बालबर्नी याने 51 चेंडूत चार षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 72 धावांची खेळी केली. एंड्रयू बालबर्नी याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पॉल स्टर्लिंग आणि एल ट्युकर यांना खातेही उघडता आले नाही.
भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या तर अर्शदीप सिंह याने एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडचे दमदार अर्धशतक तर रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांच्या फटकेबाजीच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत पाच विकेटच्या मोबदल्यात 185 धावांपर्यंत मजल मारली होती.
भारताकडून ऋतुराज गायकवाडने 43 चेंडूत सर्वाधिक 58 धावा केल्या तर संजू सॅमसन याने 26 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले. रिंकू सिंह याने 21 चेंडूत 38 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले.
तर शिवम दुबे याने 16 चेंडूत दोन षटकाराच्या मदतीने नाबाद 22 धावा जोडल्या. शेवटच्या दोन षटकांत रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांनी 42 धावा जोडून भारताची धावसंख्या 185 धावांवर नेली.
आयर्लंडकडून बॅरी मॅकार्थीने दोन बळी घेतले तर मार्क एडेअर, बेंजामिन व्हाईट आणि क्रेग यंग यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.





