“मी दोषी नाही, खटल्याला सामोरे जाणार…” ; आरोप निश्चित झाल्यानंतर लालू यादवांची प्रतिक्रिया

IRCTC Scam Case। रांची आणि पुरी याठिकाणी दोन IRCTC हॉटेल्सच्या निविदेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री राबडी देवी, राजद नेते तेजस्वी यादव आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित केले. न्यायालयाने अनेक कलमांखाली आरोप निश्चित केले, तर सर्व आरोपींवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यावर लालू प्रसाद यादव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
न्यायालयात सुनावणी दरम्यान , न्यायालयाने लालू यादव यांना सर्व आरोप मान्य आहेत का असा सवाल केल्यानंतर त्यांनी उत्तर दिले. लालू यादव यांनी आपण या प्रकरणात निर्दोष असल्याचे सांगितले. त्यासोबतच आता आपल्याला खटल्याला सामोरे जावे लागेल तर आपण जाऊ असे म्हटले आहे.
न्यायालयाने आरोपींविरुद्ध त्यांच्या कथित भूमिकेच्या आधारे वेगवेगळ्या कलमांखाली आरोप निश्चित केले. राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि १२० ब अंतर्गत फसवणूक आणि कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. लालू यादव, तेजस्वी यादव आणि इतरांनी निर्दोष असल्याचे सांगितले. राबडी देवी यांनी सांगितले की,”हा खटला खोटा आहे”. न्यायालयाने म्हटले की,” संभाव्य फसवणूक ही फसवणूक म्हणून पाहिली पाहिजे आणि सरकारी तिजोरीचे नुकसान ही किरकोळ बाब नाही तर आर्थिक नुकसान आहे”. न्यायालयाने म्हटले की, “षडयंत्र गंभीर आहे, परंतु ते न्यायालयाच्या दृष्टिकोनातून लपलेले नाही.”
आयआरसीटीसी हॉटेल घोटाळा काय आहे? IRCTC Scam Case।
हे संपूर्ण प्रकरण २००४ ते २००९ या काळात लालू यादव यांच्या रेल्वेमंत्रीपदाच्या कार्यकाळात आयआरसीटीसी हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांशी संबंधित आहे. बीएनआर रांची आणि बीएनआर पुरी या दोन आयआरसीटीसी हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट सुजाता हॉटेलला देण्यात आल्याचा आरोप आहे. या कराराच्या बदल्यात लालू यादव यांना एका बेनामी कंपनीमार्फत तीन एकर जमीन मिळाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.
सीबीआयने २०१७ मध्ये लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध एफआयआर दाखल केला. सीबीआयने दिल्लीतील एका न्यायालयात सांगितले की, सर्व आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. यादव कुटुंबाने त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याचा दावा करत तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचा दावा आहे की हा खटला राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. IRCTC Scam Case।





