रेल्वेच्या 2 कंपन्यांना मिळाला ‘नवरत्न’ दर्जा, याचा नक्की फायदा काय? वाचा

Navratna Status | केंद्र सरकारद्वारे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) या कंपनीने नवरत्न दर्जा देण्यात आला आहे. या नवरत्न दर्जा प्राप्त होणाऱ्या अनुक्रमे 25 आणि 26व्या कंपन्या आहेत.
याआधी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, तलज जल विद्युत निगम, नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आणि रेलटेल कॉर्पोरेशनसह एकूण 26 कंपन्यांना नवरत्न दर्जा प्राप्त झाला आहे.
नवरत्न दर्जा म्हणजे काय?
केंद्र सरकारद्वारे मिनीरत्न, नवरत्न आणि महारत्न अशा तीन श्रेंणीमध्ये कंपन्यांना दर्जा दिला होता. याचा उद्देश हा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना स्पर्धात्मक फायदा व्हावा व जगभरात विस्तार करता यावा हा आहे. हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर कंपन्यांना काही सुविधाही मिळतात.
1997 मध्ये नवरत्न योजना सुरू झाली. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमातील (सीपीएसई) कंपन्यांना ओळख मिळावी यासाठी याची सुरुवात करण्यात आली. ‘मिनीरत्न’ श्रेणी I मध्ये वर्गीकृत असलेल्या सरकारी कंपन्यांना नवरत्न मिळतो. कंपनीच्या उत्कृष्ट आर्थिक आणि बाजारातील कामगिरीची दखल घेत हा दर्जा दिला जातो. अर्थ मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रम विभागाकडून (DPE) कंपन्यांना हा दर्जा प्रदान केला जातो.
नवरत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी पात्रता व फायदे
कंपनीला याआधी मिनीरत्न श्रेणी I दर्जा मिळालेला असणे आवश्यक आहे. याशिवाय, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या अनुसूची A सूची अंतर्गत सूचीबद्ध असणे गरजेचे आहे. कंपनीला गेल्या पाच वर्षांपैकी किमान तीन वर्षांसाठी मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग सिस्टम अंतर्गत उत्कृष्ट किंवा खूप चांगले रेटिंग मिळाले पाहिजे. याशिवाय, दर्जा देण्याआधी इतर मानक देखील तपासले जातात.
नवरत्न दर्जा प्राप्त झाल्यामुळे कंपन्यांना आर्थिक आणि कार्यक्षमतेची अधिक स्वायत्तता मिळते. कंपनीला कोणत्याही सरकारी परवानगीशिवाय एका प्रकल्पावर 1,000 कोटी रुपये किंवा त्याच्या एकूण निव्वळ संपत्तीच्या 15% इतकी गुंतवणूक करता येते. एकूणच, त्यांच्या निर्णयक्षमतेला गती मिळते. त्यांना परदेशात उपकंपन्या स्थापन करता येतात.





