Railways Ticket Cancellation Rules: रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! तिकीट रद्द करण्याचे नियम बदलले
Railways Ticket Cancellation Rules: यापुढे रेल्वे तिकीट बुक करताना किंवा रद्द करताना वेळेचे गणित अचूक ठेवावे लागणार आहे, अन्यथा प्रवाशांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

Railways Ticket Cancellation Rules: भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग आणि कॅन्सलेशनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, आता वेळेत तिकीट रद्द न केल्यास प्रवाशांना पूर्ण पैसे गमवावे लागू शकतात. विशेषतः गाडी सुटण्यापूर्वी ८ तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ शिल्लक असताना तिकीट रद्द केल्यास एक रुपयाही रिफंड मिळणार नाही. एप्रिल २०२६ पासून ही नवीन व्यवस्था टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे.
कॅन्सलेशन शुल्कात मोठी वाढ –
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, तिकीट रद्द करण्याच्या वेळेनुसार कपातीचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. ७२ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास फक्त ठराविक ‘फ्लॅट’ कॅन्सलेशन शुल्क कापले जाईल. २४ ते ७२ तास पूर्वी एकूण भाड्याच्या २५ टक्के रक्कम कापली जाईल. ८ ते २४ तास आधी तिकीट रद्द केल्यास ५० टक्के भाडे कापले जाईल. ८ तासांपेक्षा कमी वेळ असताना तिकीट रद्द केल्यास कोणताही रिफंड मिळणार नाही, संपूर्ण रक्कम जप्त होईल.
दलाल आणि एजंटकडून होणारी तिकीटांची काळाबाजारी रोखण्यासाठी आणि खऱ्या प्रवाशांना कन्फर्म सीट मिळावी, यासाठी हे पाऊल उचलल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
बुकिंगसाठी ‘आधार’ अनिवार्य –
रेल्वेने केवळ कॅन्सलेशनच नाही, तर बुकिंग सिस्टीममध्येही पारदर्शकता आणण्यासाठी मोठे बदल केले आहेत. ऑक्टोबर २०२५ पासून जनरल कोठ्यातील आरक्षित तिकीट बुक करताना पहिल्या १५ मिनिटांत ‘आधार ऑथेंटिकेशन’ अनिवार्य करण्यात आले आहे. तत्काळ तिकीटांसाठीही जुलै २०२५ पासून आधार व्हेरिफिकेशन सक्तीचे करण्यात आले असून, केवळ अधिकृत IRCTC प्लॅटफॉर्मवरूनच ही बुकिंग शक्य आहे.
एजंटवर कडक निर्बंध –
बोट्स (Bots) किंवा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एजंटनी तिकीट पळवू नयेत, यासाठी तत्काळ बुकिंगच्या पहिल्या ३० मिनिटांत एजंटना तिकीट बुक करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. एसी क्लाससाठी सकाळी १० ते १०:३० आणि नॉन-एसीसाठी ११ ते ११:३० या वेळेत एजंट तिकीट बुक करू शकणार नाहीत. यापुढे रेल्वे तिकीट बुक करताना किंवा रद्द करताना वेळेचे गणित अचूक ठेवावे लागणार आहे, अन्यथा प्रवाशांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.




