दुबई – इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी हे जखमी झाले असून ते विद्रुप झाले असण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ यांनी म्हटले आहे. सर्वोच्च नेते अयातुल्लाह मोजतबा खामेनी यांनी युद्ध सुरू ठेवण्याची शपथ घेत एक लेखी निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यानंतर हेगसेथ यांनी हा दावा केला आहे. इस्रायली हल्ल्यात वडील आयात्तुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर मोजतबा खामेनी यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली. हे पद स्वीकारल्यानंतर खामेनी यांचे हे पहिलेच विधान होते. दुसरीकडे इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्यासाठी कोणताही आयुर्विमा लागू नसल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायलची संयुक्त मोहीम अपेक्षेपेक्षा चांगली चालली आहे आणि इस्रायल कधीहीपेक्षा अधिक मजबूत आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी आणि हिजबुल्लाह नेते नईम कासेम यांना इस्रायल लक्ष्य करेल. मी दहशतवादी संघटनांच्या कोणत्याही नेत्यावर जीवन विमा पॉलिसी काढणार नाही, असे सूचक वक्तव्यही नेतान्याहू यांनी केले.