Iran India Friendship: होर्मुझमधून भारताला सुरक्षित मार्ग मिळणार; इराणी राजदूत म्हणाले- ‘भारत आमचा मित्र आहे’
Iran India Friendship: भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फथली यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताला सुरक्षित मार्ग मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Iran India Friendship : इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा तेल आणि एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्याने जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीत भारतासाठी दिलासादायक बातमी आली आहे. भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फथली यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताला सुरक्षित मार्ग मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, “होय, कारण भारत आमचा मित्र आहे. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसेल.”
भारत-इराण मैत्री अधोरेखित
राजदूत फथली यांनी भारत आणि इराण यांच्यातील दीर्घकालीन ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबंधांवर विशेष भर दिला. ते म्हणाले, “इराण आणि भारत खरे मित्र आहेत. आमचे प्रादेशिक हित आणि विश्वास समान आहेत. भारत सरकारने विविध क्षेत्रांमध्ये आमची मदत केली आहे.” अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांबाबत बोलताना ते म्हणाले की इराणची स्थिती मजबूत असून दोन्ही देशांचे सामायिक हित प्रादेशिक शांती आणि विकासाला बळकटी देतील. जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर आलेले हे विधान भारत-इराण संबंध भविष्यात आणखी दृढ होणार असल्याचे सूचित करते.
होर्मुझ सामुद्रधुनी म्हणजे काय?
होर्मुझ सामुद्रधुनी पर्शियन आखातला ओमानच्या आखात आणि अरबी समुद्राशी जोडते. जगातील सुमारे २० टक्के तेल आणि वायूचे परिवहन याच मार्गाने होते. या सामुद्रधुनीची रुंदी ३३ किलोमीटर आहे, मात्र जहाजांसाठी उपलब्ध मार्ग आणखी अरुंद आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार येण्यासाठी २ मैल आणि जाण्यासाठी २ मैलाचा शिपिंग लेन सुरक्षित मानला जातो. जहाजांमध्ये टक्कर होऊ नये म्हणून दोन्ही लेनमध्ये २ मैलाचा बफर झोनही ठेवला जातो. युद्धामुळे या मार्गावरून तेलवाहू जहाजांची वाहतूक विस्कळीत झाल्याने जागतिक स्तरावर मोठा परिणाम जाणवत आहे.
भारतासाठी होर्मुझ किती महत्त्वाची?
ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून होर्मुझ सामुद्रधुनी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारत आपल्या एकूण एलपीजी गरजेपैकी सुमारे ९० टक्के आणि कच्च्या तेलाचा मोठा वाटा याच मार्गाने आयात करतो. मात्र सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ७० टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आता पर्यायी मार्गांनी आणण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत इराण राजदूतांचे हे विधान भारतासाठी मोठा दिलासा देणारे मानले जात आहे.





