Squad for Irani Cup 2024 announced : भारतातील क्रिकेटमध्ये नवा देशांतर्गत हंगाम सुरू झाला आहे. सध्या भारत विरूध्द बांगलादेश ही दोन सामन्याची कसोटी मालिकादेखील सुरू आहे. त्यापूर्वी नुकतीच दुलीप ट्रॉफी स्पर्धा पार पडली असून आता इराणी कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी लढत होणार आहे. दुलीप ट्रॉफीनंतर इराणी कपमध्येही टीम इंडियाचे काही मोठे चेहरे दिसणार आहेत.
इराणी कप 2024 स्पर्धेत एकच सामना आहे. यामध्ये, रणजी ट्रॉफीचा विजेता संघ आणि उर्वरित खेळाडूंना एकत्र करून शेष भारत संघ (रेस्ट ऑफ इंडिया)तयार केला जातो. गेल्या वेळी मुंबई संघाने रणजी करंडक विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यावेळी मुंबई आणि शेष भारतीय संघ(रेस्ट ऑफ इंडिया) आमनेसामने येणार आहेत.
त्यानुसार इराणी कप 2024 स्पर्धेत रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेचा विजेता मुंबई संघ आणि शेष भारत संघ (रेस्ट ऑफ इंडिया) आमने-सामने असणार आहेत. ही लढत लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर 1 ते 5 ऑक्टोबर 2024 दरम्यान पार पडेल आणि यासाठी मंगळवारी बीसीसीकडून दोन्ही संघांच्या 15 सदस्यांची संघाची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबईचे कर्णधारपद अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे, तर शेष भारत संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा दोन मराठमोळे कर्णधार म्हणजेच रहाणे विरुद्ध ऋतुराज असा सामना पाहायला मिळणार आहे. शेष भारतीय संघात असे अनेक खेळाडू खेळताना दिसणार आहेत, जे टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहेत.
शेष भारताचे कर्णधारपद रुतुराजकडे…
शेष भारताचे (रेस्ट ऑफ इंडिया) कर्णधारपद रुतुराजकडे तर अभिमन्यू ईश्वरनला संघाचे उपकर्णधार देण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज यश दयाल आणि यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. तथापि, दोघांबाबत एक समस्या आहे. वास्तविक, मुंबईविरुद्ध दयाल आणि जुरेल यांचा सहभाग कानपूर कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांना संधी न मिळण्यावर अवलंबून असेल कारण बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हे दोघेही भारतीय संघाचा भाग आहेत. तसेच या संघात साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, इशान किशन, मुकेश कुमार, खलील अहमद अशा अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे.
अजिंक्य रहाणे असेल मुंबईचा कर्णधार..
अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघात पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर हे भारतीय संघातील मोठे चेहरे या संघात दिसणार आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी संपताच हा सामना सुरू होईल. इराणी ट्रॉफी ही देशातील प्रतिष्ठित ट्रॉफींपैकी एक आहे. त्यामुळे येथेही खेळाडूंना त्यांची सर्वोत्तम कामगिरी करायला आवडेल. कारण अय्यर नुकताच दुलीप करंडक स्पर्धेत सहभागी झाला होता. पण तो फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. त्याच्या बॅटमधून एकही शतक आले नाही. मात्र इराणी कप स्पर्धेत चांगली कामगिरी करून त्याला टीम इंडियात पुनरागमन करण्याची आणखी एक संधी असेल. सर्फराज खान आणि शिवम दुबे भारताच्या कर्तव्यातून मुक्त झाल्यास मुंबई संघात सामील होतील.
Ind vs Ban 2nd Test : दुसऱ्या कसोटी सामन्यात कशी असेल कानपूरची खेळपट्टी? समोर आली मोठी अपडेट…
संजू सॅमसनकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष …
संजू सॅमसनकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले आहे. अलीकडेच त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती. यानंतरही त्याला शेष भारत (रेस्ट ऑफ इंडिया) संघात स्थान मिळाले नाही. दुलीप ट्रॉफीमध्ये संजू सॅमसनची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याला भारत-ड संघाकडून फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. या काळात त्याने चार डावात एक शतक आणि दोनदा 40+ धावा केल्या. दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने एकूण 196 धावा केल्या होत्या. त्यानंतरही बीसीसीआयने त्याला इराणी ट्रॉफीमध्ये संधी दिली नाही.
…तर त्यांना इराणी कपसाठी संधी मिळेल…
बीसीसीआयने म्हटले आहे की, “भारत आणि बांगलादेश संघात कसोटी मालिकाही सुरू आहे. या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात असलेल्या काही खेळाडूंना इराणी कपसाठीच्या दोन्ही संघात संधी देण्यात आली आहे. पण आता बांगलादेशविरूध्दच्या भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांना संधी न मिळाल्यास त्यांना इराणी कप स्पर्धेसाठी मुक्त केले जाईल.”
🚨 NEWS 🚨
Rest of India squad for ZR Irani Cup 2024 announced.
Details 🔽 #IraniCup | @IDFCFIRSTBankhttps://t.co/7TUOgRc3bu
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 24, 2024
शेष भारत संघ – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)*, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुतार, सरांश जैन, प्रसिद्ध कृष्ण, मुकेश कुमार, यश दयाल*, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद आणि राहुल चहर
मुंबईचा संघ – अजिंक्य रहाणे ( कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे(यष्टीरक्षक), सिद्धांत अद्धातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियान, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान.