Ind vs Ban 2nd Test (Pitch Report) : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चेन्नई कसोटीत बांगलादेशचा पराभव करून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने बांगलादेशला 515 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र बांगलादेशचा संघ 234 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकला. या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांना अश्विन आणि जडेजाची फिरकी गोलंदाजी समजू शकली नाही. दरम्यान, बांगलादेशच्या खेळाडूंच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. ग्रीन पार्कच्या खेळपट्टीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
जाणून घ्या, कशी असेल खेळपट्टी…
ईएसपीएन क्रिकइन्फो (ESPNcricinfo) ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, दुसऱ्या टेस्टसाठी कानपूरमधील ग्रीनपार्क मैदानावरील खेळपट्टी काळ्या मातीची असेल. ग्रीन पार्कची खेळपट्टी सपाट असेल, कसोटी सामना जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी संथ होत जाईल आणि कमी बाउन्स (कमी उसळी)मिळेल, असे मानले जाते. त्यामुळे ही खेळपट्टी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल.
कानपूर येथे फिरकीपटूला अधिक टर्न मिळण्याची आशाही कमी आहे. याचा स्पष्ट अर्थ या खेळपट्टीवर फलंदाजांना फारसा त्रास होणार नाही आणि ते सहज धावा करू शकतील. कानपूरचा स्लो ट्रॅक (संथ खेळपट्टी) लक्षात घेता दोन्ही संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतात. खेळपट्टी पाहता टीम इंडिया कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यापैकी एकाचा संघात समावेश करू शकते.
कानपूरमध्ये टीम इंडियाचं रेकाॅर्ड….
टीम इंडियाने शेवटचा सामना 2021 मध्ये ग्रीन पार्कमध्ये खेळला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता. टीम इंडिया तीन वर्षांनंतर टेस्ट मॅच खेळण्यासाठी कानपूरला येत आहे. गेल्या वेळी टीम इंडियाने येथे सामना खेळला तेव्हा श्रेयस अय्यरने कसोटीत पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने शानदार शतक आणि अर्धशतक झळकावले. ग्रीनपार्क येथे भारताने एकूण 23 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 7 जिंकले असून 3 हरले आहेत. त्याचबरोबर 13 सामने अनिर्णित राहिले आहेत.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.