US-Israel-Iran War: जमिनीवर सैन्य उतरवणार? ट्रम्पनी दिला धक्कादायक इशारा; इराणची नेव्ही, एअरफोर्स, लीडरशिप, सगळं संपलं!
US-Israel-Iran War: व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी जाहीर केले की अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांत इराणी राजवटीतील ४९ अत्यंत वरिष्ठ नेते ठार झाले आहेत. त्या म्हणाल्या, "दहशतवाद्यांना ठार करणे हे अमेरिकेसाठी चांगलेच आहे."

US-Israel-Iran War: अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांदरम्यान इराण आता चर्चेसाठी तयार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले. मात्र त्याचवेळी ट्रम्प यांनी स्पष्ट केले की आता बोलणीसाठी खूप उशीर झाला आहे. इराणची एअर डिफेन्स, एअर फोर्स, नेव्ही आणि संपूर्ण नेतृत्व यंत्रणा नेस्तनाबूत झाली असल्याचा दावाही त्यांनी केला.
‘बूट्स ऑन द ग्राउंड’ही नाकारले नाही –
ट्रम्प यांनी न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत इराणविरोधात जमिनीवर सैन्य उतरवण्याची शक्यताही नाकारली नाही. ते म्हणाले, “प्रत्येक राष्ट्राध्यक्ष म्हणतो ‘जमिनीवर सैन्य पाठवणार नाही.’ मी तसे म्हणत नाही. मी म्हणतो, ‘कदाचित गरज पडणार नाही’ किंवा ‘गरज पडली तर पाठवू.'”
त्याचबरोबर ट्रम्प यांनी स्पष्ट केले की अमेरिकेकडे चार ते पाच आठवड्यांच्या नियोजित कालावधीपेक्षाही जास्त काळ लष्करी कारवाई सुरू ठेवण्याची क्षमता आहे.
हेगसेथ म्हणाले — ‘आम्ही पत्ते उघडे करणार नाही’
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सोमवारच्या पत्रकार परिषदेत सांगितले की ट्रम्प प्रशासन पुढील लष्करी हालचाली आधीच जाहीर करण्याची ‘मूर्खपणाची’ चूक करणार नाही.
रविवारी वेगळे बोलले होते ट्रम्प-
अटलांटिक मासिकाला दिलेल्या रविवारच्या मुलाखतीत मात्र ट्रम्प यांनी वेगळी भूमिका घेतली होती. ते म्हणाले होते, “ते बोलणी करायला तयार आहेत आणि मीही तयार आहे. त्यांनी हे आधीच करायला हवे होते. ते खूप व्यावहारिक आणि सोपे होते. त्यांनी खूप उशीर केला.”
४९ वरिष्ठ नेते ठार; व्हाइट हाउसची घोषणा
व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी जाहीर केले की अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांत इराणी राजवटीतील ४९ अत्यंत वरिष्ठ नेते ठार झाले आहेत. त्या म्हणाल्या, “दहशतवाद्यांना ठार करणे हे अमेरिकेसाठी चांगलेच आहे.”
सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांनाही अमेरिका-इस्रायलच्या तेहरानवरील हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते आणि ते ठार झाल्याचे ट्रम्प यांनी आधीच सांगितले होते.





