New Iran Defense Minister Killed: मध्यपूर्वेतील युद्धात इराणला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर नव्याने नियुक्त करण्यात आलेले संरक्षणमंत्री सय्यद माजिद अब अल-रेझा हे शपथ घेतल्यानंतर अवघ्या २४ ते ४८ तासांत इस्रायली हवाई हल्ल्यात ठार झाल्याचा दावा इस्रायली वृत्तवाहिनी चॅनेल १२ ने केला आहे. हा हल्ला तेहरानमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. नियुक्ती आणि लगेच मृत्यू – खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणचे संरक्षणमंत्री अझिझ नासिरझादेह आणि आयआरजीसी कमांडर मोहम्मद पाकपूर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आधीच मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी रिव्होल्युशनरी गार्ड्सचे जनरल सय्यद माजिद यांची कार्यवाहक संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती केली. मात्र नियुक्तीनंतर एक-दोन दिवसांतच इस्रायलने त्यांना लक्ष्य करून ठार केल्याचा दावा करण्यात आला आहे. आधीच खिळखिळी झालेली तेहरानमधील सुरक्षा व्यवस्था या घटनेमुळे आणखी कमकुवत झाल्याचे दिसत आहे. हेही वाचा – इराण युद्धाचा थेट फटका तुमच्या स्वयंपाकघराला! पिस्ता, केशर, खजूर महागले; पुढे आणखी संकट? ७८७ जणांचा बळी, १७६ मुले – शनिवारपासून सुरू झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांमध्ये इराणचे अणू तळ, क्षेपणास्त्र केंद्रे, हवाई संरक्षण यंत्रणा आणि लष्करी नियंत्रण केंद्रे लक्ष्य करण्यात आली. इराण रेड क्रिसेंट सोसायटीच्या माहितीनुसार, आतापर्यंत ७८७ हून अधिक जण ठार झाले असून यात १७६ बालकांचा समावेश आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणची क्षेपणास्त्र क्षमता आणि अणू कार्यक्रम पूर्णपणे नष्ट होईपर्यंत हल्ले सुरूच राहतील, असे स्पष्ट केले आहे. इराण एकाकी पडतोय – इराणने जशास तसे क्षेपणास्त्र हल्ले केले असले तरी इस्रायलने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. नव्या संरक्षणमंत्र्यांच्या मृत्यूमुळे इराणची संरक्षण यंत्रणा आणखी दुर्बल होत आहे. अनेक मुस्लिम देशांनी उघडपणे इराणची बाजू न घेतल्याने तो आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडत असल्याचे चित्र आहे. इस्रायलचे लक्ष्य आता इराणमध्ये सत्तापालट घडवून आणणे असल्याचे दिसते, जिथे नेतृत्व कमकुवत करून अंतर्गत उठावाला खतपाणी घातले जात आहे.