Iran US War Update: अमेरिकेचा इराणला शेवटचा इशारा! “करार करा, अन्यथा ‘खर्ग आयलंड’ उद्ध्वस्त करू”; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
Iran US War Update: धमकी दिली असली तरी, ट्रम्प यांनी चर्चेद्वारे तोडगा निघण्याचे संकेतही दिले आहेत. "लवकरच एक करार होणे शक्य आहे," असे त्यांनी म्हटले आहे.

Iran US War Update: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. “जर लवकरच कोणताही शांतता करार झाला नाही, तर इराणचे प्रमुख ऊर्जा प्रकल्प आणि तेल विहिरी अमेरिकेकडून उद्ध्वस्त केल्या जातील,” अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. या विधानामुळे जागतिक राजकारणात खळबळ माजली आहे.
‘खर्ग आयलंड’ अमेरिकेच्या निशाण्यावर –
ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत इराणला इशारा दिला. त्यांनी म्हटले आहे की, जर आखाती देशांमधील संघर्ष संपवण्यासाठी लवकर तोडगा निघाला नाही आणि ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ (Hormuz Strait) व्यापारासाठी खुली केली नाही, तर अमेरिका मोठी लष्करी कारवाई करेल. या कारवाईत इराणचे इलेक्ट्रिक प्लॅन्ट्स, तेल विहिरी आणि विशेषतः ‘खर्ग आयलंड’ पूर्णपणे नष्ट केले जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
खर्ग आयलंड इतके महत्त्वाचे का आहे?
खर्ग आयलंड हे इराणचे सर्वात मोठे तेल निर्यात केंद्र आहे. इराणच्या अर्थव्यवस्थेसाठी हे बेट अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. इराणचा बहुतांश कच्चा तेलाचा पुरवठा याच बेटावरून होतो. त्यामुळे यावर हल्ला झाल्यास केवळ इराणच नाही, तर संपूर्ण जगातील तेलाच्या किमती भडकण्याची भीती आहे.
हेही वाचा – Rupee vs Dollar: ऐतिहासिक नीचांक! रुपया पहिल्यांदाच 95 पार; सर्वत्र चिंतेचे वातावरण
चर्चेची दारे अजूनही उघडी –
धमकी दिली असली तरी, ट्रम्प यांनी चर्चेद्वारे तोडगा निघण्याचे संकेतही दिले आहेत. “लवकरच एक करार होणे शक्य आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, जर हा प्रयत्न अपयशी ठरला, तर अमेरिका मागे हटणार नाही, हे देखील त्यांनी निक्षून सांगितले आहे.
जागतिक सुरक्षेला धोका –
तज्ज्ञांच्या मते, जर होर्मुजची सामुद्रधुनी बंद झाली किंवा खर्ग आयलंडवर हल्ला झाला, तर जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत होईल. आधीच या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. आता संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिका आणि इराणमधील संभाव्य कराराकडे लागले आहे. जर वेळेत तोडगा निघाला नाही, तर या संघर्षाचे रूपांतर मोठ्या युद्धात होऊ शकते, असा इशाराही विश्लेषकांनी दिला आहे.





