Iran US Conflict: इराणला घेरण्यासाठी अमेरिकेची ‘होर्मुझ’ रणनीती ; रशियाचा थेट इशार, ‘दिलेली आश्वासने मोडली’
Iran US Conflict: इराणविरुद्धच्या अमेरिकेच्या अलीकडील लष्करी कारवाईवर रशियाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

Iran US Conflict: इराणविरुद्धच्या अमेरिकेच्या अलीकडील लष्करी कारवाईवर रशियाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यातील सामंजस्य कराराचे (एमओयू) उल्लंघन केले आहे.
त्यांनी आरोप केला की, अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे केवळ इराणचेच नव्हे, तर पर्शियन गल्फ प्रदेशातील नागरी लक्ष्यांचेही नुकसान झाले असून, त्यामुळे संपूर्ण प्रदेशाच्या स्थिरतेला धोका निर्माण झाला आहे.
रशियाचा अमेरिकेवर करार मोडल्याचा आरोप
मॉस्कोमध्ये चाडच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सर्गेई लावरोव्ह यांनी, “अमेरिकेची नवीन लष्करी कारवाई ही दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने केलेल्या कराराच्या मूळ हेतूच्या विरोधात आहे”. असे सांगितले. त्यांनी म्हटले की, “लष्करी कारवाईने कोणताही वाद सुटू शकत नाही.
‘हल्ल्यांमध्ये नागरी लक्ष्यांचेही नुकसान झाले’ Iran US Conflict:
लावरोव्ह यांनी दावा केला की, इराण तसेच पर्शियन गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) सदस्य देशांमधील नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. त्यांनी इशारा दिला की, अशा हल्ल्यांमुळे प्रदेशात अस्थिरता वाढेल आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसेल.
ट्रम्प यांच्या वक्तव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण
रशियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, अमेरिकेसोबतच्या कोणत्याही भविष्यातील करारावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी अलास्कामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेचा दाखला देत म्हटले की, अनेक पूर्वीच्या करारांचे पूर्णपणे पालन झालेले नाही.
इराणनेही निषेध व्यक्त केला
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या हल्ल्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेचे उल्लंघन म्हटले आहे. तेहरानचे म्हणणे आहे की, अमेरिकेने युद्धविराम आणि तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. इराणने आरोप केला आहे की, या हल्ल्यांमध्ये वाहतूक पायाभूत सुविधा, मालवाहू जहाजे आणि इतर नागरी सुविधांनाही लक्ष्य करण्यात आले होते.
होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला Iran US Conflict:
इराणने सुरक्षेचे कारण देत होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक तात्पुरती थांबवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, या जलमार्गावर अमेरिकेचे नियंत्रण असून तो पुन्हा खुला करण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या दाव्यांमुळे या प्रदेशात तणाव कायम आहे.






