Iran strikes US : बहरिनमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर इराणचा पुन्हा मारा; अमेरिकेची तिसरी विमानवाहू युद्धनौका तैनात
अमेरिकेकडून युएसएस थिओडोर रुझवेल्ट कॅरियर स्ट्राइक ग्रुप त्या प्रदेशात दाखल झाला असल्याचे यूएस सेंट्रल कमांडच्यावतीने स्पष्ट करण्यात आल्यानंतर इराणचा हा हल्ला झाला आहे.

Iran strikes US – बहरिनमधील अमेरिकेच्या रडार सुविधेवर इराणने आज पुन्हा मारा केला. अलिकडच्या काळात इराणने बहरिनमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर केलेला हा तिसरा हल्ला आहे.
दोन महिन्यांच्या काळानंतर इराणने पुन्हा बहरिनवरील हल्ल्यांना अलिकडेच पुन्हा सुरुवात केली आहे. इराणच्या हल्ल्यांबाबत पूर्वसूचनेचे अलार्म वाजवण्यात आल्यानंतर इराणच्या हवाई हल्ल्याला रोखण्यात आल्याचे बहरिनने म्हटले आहे.
अमेरिकेकडून युएसएस थिओडोर रुझवेल्ट कॅरियर स्ट्राइक ग्रुप त्या प्रदेशात दाखल झाला असल्याचे यूएस सेंट्रल कमांडच्यावतीने स्पष्ट करण्यात आल्यानंतर इराणचा हा हल्ला झाला आहे. इराणविरुद्धच्या संघर्षासाठी आखाती प्रदेशात दाखल झालेली अमेरिकेच्या नौदलाची ही तिसरी विमानवाहू युद्धनौका आहे.
या युद्धनौकेवरून अमेरिकेचे हजारो सैनिक इराणवरील हल्ल्यांमध्ये सहभागी होणार आहेत. इराणच्या जहाज वाहतुकीची नाकेबंदी कायम ठेवण्यासाठी या प्रदेशात असलेल्या युएसएस जॉर्ज एचडब्ल्यू बुश आणि युएसएस जॉर्ज वॉशिंग्टन ही विमानवाहू जहाजे आणि अमेरिकी नौदलाच्या लहान जहाजांच्या ताफ्यामध्ये यूएसएस रूझवेल्टचाही समावेश झाला आहे.
वाटागाटी रखडल्या
अलिकडच्या काळात इराणकडून होऊ लागलेल्या हल्ल्यांमुळे आणि अमेरिकेकडून आखाती प्रदेशात अतिरिक्त सैन्य दल तैनात केल्यामुळे कतारच्या मध्यस्थीने सुरू करण्यात आलेली शांतता चर्चा आता रखडली असल्याचे चित्र आहे.
इराणकडून सध्याच्या स्थितीचे वर्णन युद्ध नाही, शांतता नाही, अशी असल्याचे म्हटले जाते आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर समाप्त व्हावी, अशी इराणची अपेक्षा आहे.





