US-Israel Strikes: इस्त्रायलचा ‘महात्मा गांधी हाॅस्पिटल’वर हल्ला; सर्वकाही उद्ध्वस्त, इराणने शेअर केला व्हिडीओ
US-Israel Strikes: नागरी सुविधांवरील हल्ल्यांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

US-Israel Strikes: इराणने अमेरिकेसह इस्रायलवर तीव्र टीका करत सुरू असलेल्या संघर्षात नागरिकांच्या पायाभूत सुविधांवर लक्ष्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अमेरिकन-इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये इराणमधील ६०० हून अधिक रुग्णालये आणि ६० हून अधिक शाळांवर हल्ले झाल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे.
भारतातील इराणी दूतावासाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तेहरानमधील ‘महत्मा गांधी हॉस्पिटल’वरील नुकसानीचे दृश्य दाखवले आहे. मुलांसाठी असलेल्या या रुग्णालयाच्या इमारतीला हवाई हल्ल्यांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे या व्हिडिओत दिसते.
व्हिडिओमधील निवेदकाच्या म्हणण्यानुसार, इराणने सुरू असलेल्या युद्धात ११ देशांवर हल्ले केले असले तरी त्यांनी कधीही रुग्णालये किंवा मुलांना लक्ष्य केले नाही. उलट अमेरिकन-इस्रायली कारवाईत मोठ्या प्रमाणावर नागरी ठिकाणांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Mahatma Gandhi Hospital, Tehran. pic.twitter.com/NpvbmN32sR
— Iran in India (@Iran_in_India) April 12, 2026
२ मार्चला हल्ला; WHO कडूनही पुष्टी –
‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, २ मार्च रोजी उत्तर तेहरानमधील महात्मा गांधी हॉस्पिटलवर इस्रायलने हवाई हल्ला केला. या घटनेची पुष्टी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील केली आहे.
हा हल्ला अमेरिकन-इस्रायली संयुक्त लष्करी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी झाला. ही मोहीम २८ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, त्याआधीच्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे.
इराणच्या ‘ISNA’ वृत्तसंस्थेने या हल्ल्याला “झायनिस्ट-अमेरिकन हवाई हल्ला” असे संबोधले आहे. ‘फार्स’ आणि ‘मिझान’ या वृत्तसंस्थांनीही रुग्णालयातील व्हिडिओ प्रसिद्ध केले असून, त्यामध्ये व्हीलचेअरजवळ पडलेला ढिगारा आणि उद्ध्वस्त झालेले मजले दिसत आहेत. गांधी स्ट्रीट परिसरातील दोन प्रत्यक्षदर्शींनीही रुग्णालयाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.
हल्ल्यानंतर रुग्णालयातील रुग्णांना तातडीने अन्य ठिकाणी हलवण्यात आले असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात असून, नागरी सुविधांवरील हल्ल्यांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.





