अमेरिकेबरोबरच्या चर्चेची शक्यता इराणने फेटाळली
तेहरान – इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेबरोबर चर्चा करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. अमेरिकेचे आज्ञाधारक बनण्यास इराणची जनता कधीही मान्य करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
इराणने अमेरिकेचे आज्ञाधारक बनावे, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. या अपमानास्पद अपेक्षेने इराणची जनता दुखावली गेली आहे. अशा खोट्या अपेक्षांविरोधात इराणी जनता ठाम उभी राहिल, असे सांगून खामेनी यांनी वॉशिंग्टनशी थेट वाटाघाटी करण्याचे आवाहन नाकारले. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून अमेरिकेचे इराणबरोबरचे शत्रुत्व कायम आहे, असेही ते म्हणाले.
इराण आणि पाश्चात्य देशांच्या प्रतिनिधींमध्ये उद्या (मंगळवारी) चर्चा होणार आहे. या चर्चेद्वारे इराणवर राजेशाही लादण्याचा प्रयत्न आहे. असा प्रयत्न इराणच्या संयमी जनतेने आणि सरकारी संस्थांनी यापुर्वीच फेटाळला असल्याचेही खामेनी म्हणाले.
जूनमध्ये इस्रायली आणि अमेरिकेने इराणमधील प्रमुख अणुस्थळांना लक्ष्य केले आणि इराणला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले हे हल्ले इराणला अस्थिर करण्यासाठी रचले गेले होते, असा दावाही खामेनी यांनी केला.
इराणमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्नच इराणच्या विरोधकांकडून केला जातो आहे. त्यामुळे इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांना पाठिंबा दिला गेला पाहिजे आणि ऐक्याचे दर्शन घडवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.





