Iran launches satellite : इराणने केले उपग्रहाचे प्रक्षेपण

Iran launches satellite – इराणने आज एका उपग्रहाचे प्रक्षेपण केले. अवकाशातील आतापर्यंतच्या सर्वात उंचीवरच्या पातळीवर हा उपग्रह स्थापित करण्यात आला आहे. इराणने केलेल्या या उपग्रह प्रक्षेपणामुळे इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल जगाला वाटणारी चिंता अधिकच वाढली आहे.
इस्रायल आणि हमासमधील युद्धाचा परिणाम म्हणून मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. त्यातच इराणने अलिकडेच पाकिस्तान, सीरिया आणि इराकमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. विशेषतः पाकिस्तानमध्ये केलेल्या मार् यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव उत्पन्न झाला होता. दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभुमीवर इराणने या उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे.
इराणने अण्वस्त्रे वाहून नेऊ शकणार् या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर संयुक्त राष्ट्राने बंदी घातली आहे. त्यामुळे इराणकडून उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणे हे संयुक्त राष्ट्राच्या निर्बंधांचे ल्लंघन असेल, असे अमेरिकने पूर्वी म्हटले होते.
मात्र आपण अण्वस्त्रे निर्मिती करत नसल्याचे इराणने म्हटले आहे. अवकाश कार्यक्रम आणि अणूउर्जा कार्यक्रम हा केवळ नागरी हेतूसाठी आहे, असेही इराणने म्हटले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून इराणने अण्वस्त्रांच्या निर्मितीला आवश्यक तेवढे युरेनियम जमा केले आहे.
सर्वात उंचीवर प्रस्थापित केलेला उपग्रह
इराणने सोराया नावाचा हा उपग्रह जमिनीपासून तब्बल ७५० किलोमीटर उंचीवर स्थापित केला आहे. क्वाम या ३ टप्प्यांच्या रॉकेटच्या माध्यमातून हा उपग्रह सोडण्यात आला असून रॉकेटवर ५० किलोचा पेलोड आहे. हा उपग्रह इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या उपग्रह कार्यक्रमाचा भाग म्हणून अवकाशात सोडण्यात आला आहे. हा उपग्रह नक्की कशासाठी सोडण्यात आला हे स्पष्ट केले गेलेले नाही.





