War Updates: इराणचा इस्रायलवर भीषण पलटवार! बंदराजवळ जहाजावर ड्रोन हल्ला; ‘MSC Ishyka’ आगीच्या भक्ष्यस्थानी
War Updates: इराणने हॉर्मुजच्या समुद्रात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि इस्रायलला धडा शिकवण्यासाठी हा ड्रोन हल्ला केला आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता या युद्धाकडे लागले आहे.

War Updates: मध्यपूर्वेतील युद्ध आता अधिकच चिघळले आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने रौद्र रूप धारण केले असून, शनिवारी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) हॉर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ इस्रायली मालकीच्या एका जहाजावर ड्रोनने भीषण हल्ला केला. या हल्ल्यानंतर ‘MSC Ishyka’ या जहाजाला मोठी आग लागली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
नेमकी घटना काय?
इराणी सरकारी मीडिया ‘सेपाह न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार, रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या नौदलाने बहरीनच्या खलिफा बिन सलमान बंदराजवळ ही कारवाई केली. हे जहाज इस्रायली मालकीचे असले तरी त्यावर लायबेरियाचा ध्वज होता. ड्रोनच्या धडकेनंतर जहाजातून आगीच्या ज्वाला आणि काळ्या धुराचे लोट आकाशात उंचवर उडताना दिसत आहेत. सुदैवाने, या हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
युद्धाची पार्श्वभूमी आणि इराणचा आक्रमक पवित्रा
हे युद्ध २८ फेब्रुवारी रोजी सुरू झाले, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठे हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनाची बातमी आली होती, ज्यामुळे इराण कमालीचा संतप्त झाला आहे. प्रत्युत्तर म्हणून इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग असलेल्या ‘हॉर्मुज सामुद्रधनी’ची नाकेबंदी केली आहे. इराणने भारतासारख्या मित्र राष्ट्रांसाठी हा मार्ग अंशतः खुला ठेवला असला, तरी इस्रायल आणि अमेरिकेशी संबंधित जहाजांना ते सातत्याने लक्ष्य करत आहेत.
जागतिक अर्थव्यवस्थेवर सावट –
जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के वाटा याच मार्गावरून जातो. या ताज्या हल्ल्यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेवर इस्रायलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
भारतासाठी दिलासादायक बातमी –
मध्यपूर्वेतील या तणावाच्या परिस्थितीत भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचे एलपीजी (LPG) घेऊन जाणारे ‘ग्रीन सांव्वी’ हे जहाज हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून सुखरूप बाहेर पडले आहे. या जहाजावर ४६,६५० मेट्रिक टन गॅस आणि २५ भारतीय खलाशी होते. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी आयातदार देश असल्याने, हा मार्ग सुरक्षित असणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
दरम्यान, इराणने हॉर्मुजच्या समुद्रात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि इस्रायलला धडा शिकवण्यासाठी हा ड्रोन हल्ला केला आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता या युद्धाकडे लागले आहे.





