IPS Transfer : राज्यातील 51 आयपीएस अधिका-यांच्या बदल्या

मुंबई : महायुती सरकारकडून काही महिन्यांपासून आयएएस आणि आयपीएस अधिका-यांच्या बदल्यांचा धडाका लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. वरिष्ठ अधिका-यांच्या सातत्याने बदल्या होत असून आता तब्बल 51 आयपीएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धुळे, हिंगोली, जळगाव येथील अधिका-यांचा समावेश आहे.
महेंद्र पंडित यांना बृह्न्मुंबई पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तब्बल 51 आयपीएस अधिका-यांना काहींना प्रमोशन तर काहींचे डिमोशन करुन बदली करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या बदली आदेशान्वये पुण्यामध्ये तीन नव्या आयपीएस अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या 15 दिवसांपूर्वी 8 आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्यानंतर गेल्या आठवड्यात पुन्हा 4 आयएएस अधिका-यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले होते.
आता 51 आयपीएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांची मुंबईत पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, विजय पवार, सुनिल लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांची मुंबईतील पोलिस उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच मुंबईतील पोलिस उपायुक्त पदावर 5 आयपीएस अधिका-यांची पदोन्नतीवर नेमणूक करण्यात आली आहे.





