#IPL2020 : पंजाब व राजस्थानचे खेळाडू निगेटिव्ह
Updated On:

नवी दिल्ली – अमिरातीत आयपीएल स्पर्धेत सहभागी होणार असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब व राजस्थान रॉयल्स या दोन संघातील खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती आयपीएल समितीने दिली आहे.
या दोन संघांतील खेळाडू सपोर्ट स्टाफ व आपल्या परिवारासह येथे सर्वांत आधी दाखल झाले होते. त्यांना सहा दिवसांसाठी विलगीकरणात ठेवले गेले होते. त्यांची नुकतीच चाचणी करण्यात आली होती.
किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांतील खेळाडूंच्या तीन करोना चाचण्या झाल्या. या तिन्ही चाचण्यांमधील खेळाडूंचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता त्यांना बायो-बबल सुरक्षेमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांतील खेळाडू आता सराव करू शकतात.





