Arjun Tendulkar replace Shardul Thakur IPL Trade : आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी सुरू असलेली ‘ट्रेड विंडो’ सध्या जोरदार चर्चेत आहे. या नियमांतर्गत संघांमध्ये खेळाडूंची अदलाबदल (ट्रेड) केली जाते. सीएसके आणि आआर यांच्यातील रवींद्र जडेजा, सॅम करन आणि संजू सॅमसन यांचा समावेश असलेली ट्रेड डील जवळपास निश्चित झाली असतानाच, आता आणखी दोन मोठ्या फ्रँचायझींमध्ये एका महत्त्वाच्या कराराची चर्चा सुरू झाली आहे. या ट्रेड डीलमध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे नाव जोडले गेले आहे. विशेष म्हणजे, हा ट्रेड खेळाडूंच्या थेट अदलाबदलीऐवजी ‘कॅश डील’ स्वरूपात होण्याची शक्यता आहे. अर्जुन तेंडुलकर एलएसजीकडे जाणार? ‘क्रिकबझ’च्या एका रिपोर्टनुसार, ट्रेड विंडो अंतर्गत लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात एक रंजक सौदा होऊ शकतो. या करारानुसार, भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला लखनऊकडून रिलीझ करून मुंबई इंडियन्समध्ये (MI) सामील केले जाईल. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सचा युवा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरला लखनऊ सुपर जायंट्सकडे पाठवले जाऊ शकते. हा व्यवहार थेट अदलाबदलीचा नसून, दोन्ही फ्रँचायझींमध्ये वेगवेगळ्या ‘कॅश डील’च्या (रोख व्यवहार) स्वरूपात होणार असल्याची माहिती आहे. कॅश डील कशी होते? सॅलरीनुसार खरेदी: कोणताही संघ एखाद्या खेळाडूला त्याच्या मागील मूळ खरेदी किंमतीच्या बरोबरीची रक्कम देऊन आपल्या संघात घेऊ शकतो. उदाहरणार्थ, मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला २० लाख रुपये देऊन विकत घेतले होते. लखनऊ सुपर जायंट्सने शार्दुल ठाकूरला २ कोटी रुपये देऊन रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून संघात घेतले होते. या नियमानुसार, दोन्ही संघ याच सॅलरीमध्ये खेळाडूंना खरेदी करू शकतात. गोपनीय रक्कम निश्चित करणे: दुसरा पर्याय म्हणजे, दोन्ही फ्रँचायझी आपापसात एक विशिष्ट रक्कम निश्चित करू शकतात आणि त्या आधारावर ट्रेड पूर्ण केला जाईल. ही रक्कम सार्वजनिक केली जात नाही, ज्यामुळे हा करार गोपनीय राहतो. अशा परिस्थितीत, दोन्ही संघ मागील सॅलरीपेक्षा जास्त रक्कम खर्च करूनही खेळाडूंना आपल्या संघात घेऊ शकतात. हेही वाचा – IND vs SA : ‘भारताला त्यांच्या घरात पराभूत करण्यासाठी उत्सुक…’, मालिकेपूर्वी आफ्रिकन खेळाडूचं मोठं वक्तव्य अर्जुन तेंडुलकरसाठी मोठी संधी – अर्जुन तेंडुलकर गेल्या काही हंगामांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे, पण त्याला अपेक्षित संधी मिळालेल्या नाहीत. मागील हंगामात त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. यापूर्वी, त्याने २०२३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करताना ४ सामने खेळले होते, तर २०२४ मध्ये त्याला १ सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता त्याला एलएसजीकडे गेल्यावर खेळण्याची संधी मिळू शकते.