IPL New Teams : आयपीएलमध्ये पुन्हा मोठा धमाका; ‘या’ दोन नव्या फ्रँचायझींची होणार एन्ट्री, कोणती आहेत ‘ती’ शहरं? घ्या जाणून
IPL New Teams : २०२८ पासून आयपीएलमध्ये १२ संघांचा विस्तार होऊ शकतो. याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.

IPL Expansion 2028 Two New Teams Pune Vadodara Franchise Valuation BCCI : जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग असलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL) आपला विस्तार करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आगामी २०२८ च्या हंगामापासून लीगमध्ये किमान दोन नवीन फ्रँचायझींचा समावेश करण्याच्या पर्यायावर गांभीर्याने विचार करत आहे. ‘मिंट’च्या ताज्या अहवालानुसार, या संभाव्य विस्तारासाठी पुणे आणि वडोदरा ही दोन शहरे सर्वात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. ही चर्चा सध्या प्राथमिक स्तरावर असून अंतिम निवडीबाबत अधिकृत निर्णय येणे बाकी आहे.
प्रत्येक नव्या टीमचे मूल्यांकन १ अब्ज डॉलर्सच्या पार जाण्याची शक्यता
आयपीएलचा हा नवा विस्तार पुढील मीडिया हक्क चक्रादरम्यान (२०२८ ते २०३२) प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता आहे. देशांतर्गत बडे उद्योग समूह तसेच युरोपियन बायआउट फंड ‘परमीरा’, अमेरिकन फॅमिली ऑफिसेस आणि मध्य पूर्वेतील सॉवरेन वेल्थ फंड यांसारख्या जागतिक गुंतवणूकदारांच्या वाढत्या रसामुळे प्रत्येक नवीन फ्रँचायझीचे मूल्यांकन १ अब्ज डॉलर (सुमारे ८,३०० कोटी रुपयांहून अधिक) पार जाऊ शकते. आरसीबी आणि राजस्थान रॉयल्समधील ताज्या गुंतवणुकीने लीगची ब्रँड व्हॅल्यू प्रचंड वाढवली आहे.
वडोदरा आणि पुणे ही शहरेच का आहेत आघाडीवर?
🚨 2 NEW IPL TEAMS FROM IPL 2028 🚨
👉🏻 Till IPL 2027 – 10 Teams
👉🏻 From IPL 2028 – 12 Teams
– Pune and Vadodara emerge as potential team locations🔥
– The BCCI is exploring the option of adding two new IPL teams by 2028 👏🏻
– What are your thoughts?🤔 https://t.co/szEE0gHj5A
— Ajay Jadeja (@AjayJadeja171) November 10, 2026
वडोदरा हे गुजरातला क्रीडा हब बनवण्याच्या रणनीतीचा एक भाग आहे; भारताच्या २०३६ च्या संभाव्य ऑलिम्पिक यजमानपदाच्या पार्श्वभूमीवर या शहरात वेगाने क्रीडा पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला, पुण्याचा आयपीएलशी जुना व घट्ट संबंध राहिला आहे. यापूर्वी ‘पुणे वॉरियर्स इंडिया’ (२०११-२०१३) आणि ‘रायझिंग पुणे सुपरजायंट’ (२०१६-२०१७) या संघांचे घरचे मैदान राहिलेल्या पुण्यात जागतिक दर्जाचे स्टेडियम आणि सक्षम क्रिकेट इकोसिस्टम आधीपासूनच उपलब्ध आहे.
मीडिया हक्कांमधून नव्या विक्रमाची आशा; १२ संघांचा थरार रंगणार
🔴IPL TO BECOME A 12-TEAM LEAGUE FROM 2028? 🤯
– BCCI is reportedly exploring the addition of two new franchises from the 2028 season.
– Pune and Vadodara are among the frontrunners to get the new teams.[Moneycontrol] https://t.co/b7y8a1e3In
— Sam (@cricsam02) November 10, 2026
बीसीसीआयला २०२३-२०२७ च्या मीडिया हक्कांमधून तब्बल ४८,००० कोटी रुपयांची अभूतपूर्व कमाई झाली होती. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, २०२८ चे पुढील सायकल कमाईचे सर्व जुने विक्रम मोडीत काढेल. २०२१ मध्ये लखनौ आणि गुजरात हे दोन संघ आल्यानंतर आयपीएल १० संघांची झाली होती; आता २०२८ पासून ही संख्या थेट १२ संघांवर पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.





