IND U19 vs UAE U19 : आर्यवीर सेहवागच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर! यूएईसमोर ठेवले तब्बल ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य
IND U19 vs UAE U19 : या सामन्यात भारतीय संघाने आर्यवीर सेहवागच्या शानदार शतकाच्या जोरावर यूएईला ३१० धावांचे लक्ष्य दिले आहे.

IND U19 vs UAE U19 India Set 310 Target Aryaveer Sehwag 160 Runs : अंडर-१९ आशिया चषक २०२६ स्पर्धेत भारतीय युवा संघ युएईविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात मैदानात उतरला. नाणेफेक जिंकून युएईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना आर्यवीर सेहवाग आणि व्हिके विनिथच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ५० षटकांत ७ बाद ३०९ धावांचा डोंगर उभारला आहे. यूईला विजयासाठी ३१० धावा करायच्या आहेत.
१३१ चेंडूंत शतक; स्पर्धेतील पहिलेच धमाकेदार यश
कर्णधार लक्ष्य राजचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांच्यात पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. लक्ष्य बाद झाल्यावर वीरेंद्र सेहवागचा सुपुत्र आर्यवीर सेहवागने मैदानावर दमदार फटकेबाजी करत १३१ चेंडूंत शानदार शतक ठोकले आणि पुढे १६० धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. आर्यवीर सेहवागचे या स्पर्धेतील हे पहिलेच शतक ठरले. यापूर्वी नेपाळविरुद्ध त्याने नाबाद ७० धावांची उपयुक्त खेळी केली होती. मात्र, पाकिस्तानविरुद्ध तो अवघ्या २२ धावांवर बाद झाला होता आणि भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.
१७ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार; १६० धावांवर बाद
युएईविरुद्ध मात्र त्याने वडिलांच्या आक्रमक शैलीची आठवण करून दिली. पाकिस्तानविरुद्ध अर्जुन राजपूतने शतक झळकावले होते, तर आता आर्यवीरने शतक झळकावून आपली ताकद दाखवून दिली. शतक पूर्ण केल्यानंतर आर्यवीरने आणखी रौद्ररूप धारण केले. मैदानाच्या चारही बाजूंना चौफेर फटकेबाजी करत त्याने युएईच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. तो १६८ चेंडूंत १६० धावांची अविस्मरणीय खेळी करून बाद झाला. या महाकाय खेळीत त्याने १७ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार लगावले. त्याचा हा आक्रमक अंदाज पाहून उपस्थित क्रिकेटप्रेमी थक्क झाले.
Aaryavir’s blockbuster knock has taken India to the brink of a semi-final spot. The UAE batters will need something special from here to pull off a heist and keep their hopes alive 🤔
#DPWorldMensU19AsiaCup2026 #INDvUAE #ACC https://t.co/lEiGgyKLrm
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) November 10, 2026
व्ही. के. विनीतसोबत शतकी भागीदारी; उभारला ३०९ धावांचा डोंगर
Aaryavir Sehwag is him 🔥🙌 https://t.co/U9p7xktarN
— tj (@TamsterzTJ) November 10, 2026
आर्यवीरने व्ही. के. विनीतच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी भक्कम शतकी भागीदारी रचली. या दोघांनी आक्रमक आणि संयमी फलंदाजीचा सुंदर मेळ घालत भारताला अवघ्या ३८ षटकांत १ बाद २०३ या मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवले. विनीतने दुसऱ्या टोकाकडून उत्तम साथ देत डावाला आकार दिला, ज्यामुळे आर्यवीरला मोकळेपणाने मोठे फटके खेळण्याची संधी मिळाली. यानंतर विनीथने ६७ धावांची खेळी साकारत भारताला ३०९ धावांचा टप्पा गाठून दिला.
उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला विजय आवश्यक
ग्रुप-ए मध्ये भारतासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला भारताने नेपाळला १२८ धावांवर रोखून १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागल्याने उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला होता. आता युएईविरुद्ध सेहवागच्या १६० धावांच्या वादळामुळे टीम इंडियाने सामन्यावर भक्कम पकड मिळवली आहे.





