IPL 2026 चा बिगुल वाजला, १५ नोव्हेंबरपर्यंत संघांना सादर करावी लागेल रिटेंशन यादी; लिलावाची तारीखही ठरली

लिलाव भारतात होणार की परदेशात?
आयपीएल 2026 चा लिलाव भारतात होणार की परदेशात, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मागील दोन हंगामांपासून लिलाव परदेशात होत आहेत. 2023 मध्ये दुबईत तर 2024 मध्ये सौदी अरबमधील जेद्दाह येथे लिलाव पार पडला. एका फ्रँचायझीशी संबंधित व्यक्तीने सांगितले की, जर बीसीसीआयने यंदा मिनी-लिलाव भारतात आयोजित करण्याचा निर्णय घेतला, तर त्यात आश्चर्य वाटणार नाही.
मिनी-लिलावात मोठे बदल अपेक्षित नाहीत –
यंदाच्या मिनी-लिलावात फारसे मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे. तरीही, गेल्या हंगामात तळाच्या स्थानांवर राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्ससारख्या संघांकडून काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. सूत्रांनुसार, दीपक हुड्डा, विजय शंकर, राहुल त्रिपाठी, सॅम करन आणि डेव्हॉन कॉनवे (सीएसके) यांसारखे खेळाडू रिटेन यादीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, आर. अश्विनने निवृत्ती जाहीर केल्याने सीएसकेला 9.75 कोटी रुपये अतिरिक्त मिळाले आहेत, ज्यामुळे त्यांची पर्स अधिक मजबूत झाली आहे.
हेही वाचा – IND vs WI : यशस्वी जैस्वालने शतकासह WTC मध्ये केली कमाल! आता फक्त रोहित शर्माचं पुढे
राजस्थान रॉयल्ससमोर संजू सॅमसनचा प्रश्न –
राजस्थान रॉयल्ससाठी कर्णधार संजू सॅमसनच्या रिटेंशनबाबत मोठा प्रश्न आहे. जर एखादा ट्रेड यशस्वी झाला, तर संघ त्याला रिलीज करू शकतो. यापूर्वी संघ आपले दोन श्रीलंकन फिरकीपटू वानिंदु हसरंगा आणि महीश तीक्षनाला रिलीज करेल, अशी चर्चा होती. मात्र, कुमार संगकारा पुन्हा मुख्य प्रशिक्षक म्हणून परतण्याची शक्यता असल्याने याबाबतच्या निर्णयात बदल होऊ शकतो.
हेही वाचा – Sourav Ganguly : ‘असं सर्वांसोबतचं होतं…’, रोहितच्या जागी गिल कर्णधार होताच सौरव गांगुलीने सांगितलं सत्य!
कॅमरून ग्रीनवर सर्व फ्रँचायझींच्या नजरा –
टी. नटराजन, मिचेल स्टार्क, आकाश दीप, मयंक यादव आणि डेव्हिड मिलर यांसारख्या खेळाडूंचे भवितव्यही अनिश्चित आहे. केकेआरने गेल्या लिलावात 23.75 कोटींना खरेदी केलेल्या वेंकटेश अय्यरच्या रिटेंशनबाबतही स्पष्टता नाही. दरम्यान, सर्व फ्रँचायझींच्या नजरा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरून ग्रीनवर खिळल्या आहेत. गेल्या लिलावात दुखापतीमुळे तो सहभागी होऊ शकला नव्हता, पण यंदा तो सर्वात मोठा खेळाडू ठरेल आणि अनेक संघ त्याला आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी उत्सुक आहेत.





