IPL 2025 Retention : – आयपीएलच्या आगामी हंगामासाठी बीसीसीआयने 31 ऑक्टोबरपर्यंत संघात कायम ठेवण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी सादर करण्याच्या सूचना फ्रांचारयझींना दिल्या होत्या. त्यानुसार सर्वच संघांनी आपल्या दमदार खेळाडूंना संघात कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. ऋषभ पंत, जोस बटलर, आर अश्विन, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांसारखे दमदार खेळाडू यावेळी लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत.
आयपीएल 2025 च्या रिटेन्शनमध्ये काही धक्कादायक गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. अव्वल विकेट कीपर बॅट्समन ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन यांसारखे मोठे खेळाडू आता आयपीएल 2024 मध्ये ज्या संघांसाठी खेळले आहेत, त्यांच्यासोबत असणार नाहीत. या चौघांना त्यांच्या संघाने कायम ठेवलेले नाही. एमएस धोनीसारख्या खेळाडूला रिटेन्शन यादीत 8 कोटी रुपयांपर्यंत नुकसान सहन करावे लागले आहे. त्याला यंदा केवळ 4 कोटी रुपये मिळाले आहेत. दुसरीकडे जसप्रीत बुमराह, विराट कोहली आणि हेनरिक क्लासेन यांना मात्र कोट्यवधींचा फायदा झालेला आहे.
ऋतुराज गायकवाड (रु. 18 कोटी), शिवम दुबे (रु. 12 कोटी), संजू सॅमसन (रु. 18 कोटी), यशस्वी जैस्वाल (18 कोटी), रियान पराग (14 कोटी) आणि ध्रुव जुरेल (14 कोटी) यासारख्या नवख्या खेळाडूंना चांगलीच रक्कम मिळाली आहे.
Delhi Capitals : ऋषभ पंत लिलावासाठी उपलब्ध
डीसी संघाने यष्टीरक्षक, फलंदाज ऋषभ पंतला लिलावासाठी उपलब्ध केले आहे. जीएमआर व जेएसडब्ल्यू या दोन्हीकडे डीसीची मालकी रचना अतिशय गुंतागुंतीची आहे. जीएमआरने पदभार स्वीकारतानाच माजी क्रिकेट संचालक सौरभ गांगुली यांच्या जागी वेणुगोपाल राव यांची नियुक्ती केली. पंतने यापूर्वी यासंदर्भात चर्चा केली, मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. डीसी संघाने अक्षर पटेल (16.5 कोटी), कुलदीप यादव (13.25कोटी), ट्रिस्टन स्टब्स (रु. 10 कोटी) व अभिषेक पोरेल (रु. 4 कोटी) हे चार खेळाडू कायम ठेवले आहेत. लिलावात डीसीकडे 76.25 कोटी रुपये असतील.
Mumbai Indians : हार्दिक, रोहित एकाच संघात
मुंबई इंडियन्स संघाने जसप्रीत बुमराह (18 कोटी), सूर्यकुमार यादव (16.35 कोटी), हार्दिक पंड्या (16.35 कोटी), रोहित शर्मा (16.30 कोटी), तिलक वर्मा (8 कोटी) या पाच खेळाडूंना संघात कायम ठेवले असून यासाठी तब्बल 75 कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे लिलावामध्ये एमआयकडे केवळ 45 कोटी रुपये शिल्लक असणार आहेत. मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहचा करार 12 कोटींवरून 18 कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे. आता बुमराह मुंबई संघाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा करार कायम ठेवला आहे. त्याचा करार 16 कोटींवरून 16.3 कोटी रुपयांवर आणला आहे. म्हणजेच त्याचे नुकसान झाले आहे.
Royal Challengers Bengaluru : आरसीबी आणि विराट कोहली
सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीला आरसीबी संघाने कायम राखले आहे. पहिल्या हंगामापासून विराट कोहली व आरसीबी हे समीकरण झाले आहे. विराटच्या (21 कोटी) बरोबरीने आरसीबीने रजत पाटीदार (रु. 11 कोटी) आणि यश दयाल (5 कोटी) यांना संघात कायम ठेवले आहे. आरसीबीने तिघांसाठी 37 कोटी रुपये खर्च केले असून लिलावासाठी त्यांच्याकडे 83 कोटी रुपये शिल्लक आहेत. विराट कोहलीला 21 कोटींमध्ये संघात कायम ठेवण्यात आले असून गेल्या वर्षी त्याला 16 कोटी रुपये मिळाले होते. त्याला रिटेन्शनमुळे 5 कोटींचा फायदा झालेला आहे.
Punjab Kings : प्रभसिमरन सिंग आणि फिनिशर शशांक सिंग.
सलग 10 वर्षांपासून प्लेऑफमध्ये स्थान न मिळवणाऱ्या पंजाब किंग्स संघाने केवळ प्रभसिमरन सिंग आणि फिनिशर शशांक सिंग या दोन अनकॅप्ड खेळाडूंना संघात कायम राखले आहे. यासाठी त्यांनी केवळ साडे 9 कोटी रुपये मोजले असून 110.5 कोटी रुपये लिलावासाठी शिल्लक ठेवले आहेत.
Kolkata Knight Riders : श्रेयस मुक्त
कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरला मुक्त करण्यात आले आहे. सध्या तो भारताच्या टी-20 संघाचा सदस्य नासाने व 140 पेक्षा स्ट्राईक रेट कमी झाल्याने केकेआरने त्याला मुक्त केले. केकेआरने रिंकू सिंग (13 कोटी), वरुण चक्रवर्ती (12 कोटी), सुनील नरेन (12 कोटी), आंद्रे रसेल (12 कोटी), हर्षित राणा (4 कोटी), रमणदीप (4 कोटी) यांना संघात कायम राखले असून यासाठी 57 कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे लिलावासाठी केकेआरकडे 63 कोटी रुपये शिल्लक आहेत.
Sunrisers Hyderabad : हैदराबादचा श्रीमंत क्लासेन
भारतीय उपखंडात दमदार कामगिरी करणारा व सर्वोत्तम आक्रमक फलंदाज असणाऱ्या हेन्रिक क्लासेनला हैदराबाद संघाने कायम ठेवले आहे. याचबरोबरीने हैदराबाद संघाने क्लासेनसह पॅट कमिन्स (18 कोटी), अभिषेक शर्मा (रु. 14 कोटी), नितीश रेड्डी (रु. 6 कोटी), ट्रॅव्हिस हेड (14 कोटी) या पाच खेळाडूंना कायम ठेवले असून यासाठी 75 कोटी उपाये खर्च केले आहे. लिलावात त्यांच्याकडे 45 कोटी रुपये असतील. सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेनला23 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले आहे. सध्याच्या रिटेन्शन यादीतील कोणत्याही संघाने कोणत्याही खेळाडूला दिलेली ही सर्वात मोठी किंमत आहे.
IPL 2025 Retention : चेन्नई सुपर किंग्सकडून 5 खेळाडू रिटेन, यादी पाहून चाहत्यांना मिळेल दिलासा…
Chennai Super Kings : ‘थाला’च चेन्नईचा सुपर किंग
धोनी या हंगामात खेळणार नाही, अशा अनेक अफवांनंतर चेन्नई सुपर किंग्सने एमएस धोनीला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबरीने ऋतुराज गायकवाड (रु. 18 कोटी), मथीशा पाथिराना (रु. 13 कोटी), शिवम दुबे (रु. 12 कोटी), रवींद्र जडेजा (रु. 18 कोटी) यांना कायम राखणायसाठी 65 कोटी रुपये खर्च केले आहेत. लिलावासाठी 55 कोटींची शिल्लक आहे. एमएस धोनीला चेन्नई सुपर किंग्सने मागच्या वर्षी 12 कोटी रुपये देऊन कायम ठेवले होते. या मोसमातही त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले होते. अशाप्रकारे धोनीला केवळ 4 कोटी रुपये मिळाले असून त्याचे जवळपास 8 कोटींचे नुकसान झाले आहे.
Rajasthan Royals : बटलर, अश्विन, चहल यांना अलविदा
राजस्थान संघाने जोस बटलर, रविचंद्रन अश्विन व युझवेंद्र चहल यांना लिलावाच्या मैदानात उतरविले आहे. त्यांच्या ऐवजी युवा खेळाडूंना संघात कायम राखले आहे. यामध्ये संजू सॅमसन (रु. 18 कोटी), यशस्वी जैस्वाल (18 कोटी), रियान पराग (14 कोटी), ध्रुव जुरेल (14 कोटी), शिमरॉन हेटमायर (11 कोटी), संदीप शर्मा (4 कोटी) यांचा समावेश असून लिललावात राजस्थानकडे ४१ कोटींची शिल्लक असणार आहे.
IPL 2025 Retention : बंगळुरूने ‘या’ तीन खेळाडूंना ठेवलं कायम; विराटवर RCB ने केला पैशांचा वर्षाव…..
Lucknow Super Giants : राहुलला सोडले
एसएसजी संघाने कर्णधार लोकेश राहुल ऐवजी निकोलस पूरनला संघात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबरीने रवी बिश्नोई (रु. 11 कोटी), मयंक यादव (रु. 11 कोटी), मोहसिन खान (रु. 4 कोटी), आयुष बडोनी (रु. 4 कोटी) या खेळाडूंना संघात ठेवले आहे. एलएसजीने 51 कोटी रुपये खर्च केले असून लिलावासाठी 69 कोटी रुपये शिल्लक ठेवले आहेत.
Gujarat Titans : जीटीकडून रशीद खान कायम
अफगाणिस्तानचा टी-20 स्पेशालिस्ट असणाऱ्या रशीद खानला जीटीकडून संघात कायम ठेवण्यात आले असून भारताचा पांढऱ्या चेंडूचा उपकर्णधार शुभमन गिलला देखील जीटीने कायम ठेवले आहे. राशिद खान (रु. 18 कोटी), शुभमन गिल (रु. 16.5 कोटी), बी साई सुधारसन (8.5 कोटी), राहुल तेवतिया (रु. 4 कोटी), एम शाहरुख खान (रु. 4 कोटी) या खेळाडूंना कायम राखण्यासाठी जीटीने 51 कोटी मोजले असून लिलावासाठी 69कोटींची शिल्लक बाकी आहे.