IPL 2025 : ‘या’ गोलंदाजाचा सामना करताना ख्रिस गेलचे पाय थरथर कापायचे; के. श्रीकांतचे मोठे वक्तव्य

IPL 2025 K Srikkanth claim Chris Gayle legs started shaking when R Ashwin bowl : वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलने त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली एक वेगळीच दहशत निर्माण केली आहे. तो जेव्हा स्ट्राईकवर असायचा तेव्हा अनुभवी गोलंदाजही घाबरलेले असायचे. मात्र, भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनविरुद्ध फलंदाजी करताना तो थोडा संघर्ष करताना दिसायचा, असा दावा भारताचे माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांनी केला आहे. चेन्नईतील एका कार्यक्रमादरम्यान श्रीकांत म्हणाले की, ख्रिस गेल कोणत्याही गोलंदाजाला चौकार आणि षटकार मारायचा, पण जेव्हा चेंडू अश्विनच्या हातात असायचा, तेव्हा त्याचे पाय थरथर कापायला लागायचे.
ख्रिस गेलचे पाय थरथर कापायचे –
माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत म्हणाले, “ख्रिस गेल कोणालाही चौकार आणि षटकार मारू शकतो, पण अश्विनला त्याला बाद करण्यासाठी फक्त चार चेंडूंची आवश्यकता होती. त्यामुळे चेंडू जेव्हा अश्विनच्या हाती जायचा, तेव्हा गेलचे पाय थरथर कापायला लागायचे.” अश्विनचा ख्रिस गेलविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. अश्विनने आयपीएलमध्ये पाच वेळा गेलला बाद केले आहे. त्याचबरोबर ख्रिस गेलने अश्विनविरुद्ध ६४ चेंडूत ५३ धावा केल्या आहेत. गेलला माजी भारतीय स्टार फिरकीपटू अश्विनविरुद्ध फक्त तीन षटकार मारता आले आहेत.
श्रीकांत पुढे म्हणाले, “धोनीने त्याला एक उत्तम टी-२० गोलंदाज म्हणून ओळख निर्माण करुन दिली. अश्विनने टी-२० ते एकदिवसीय आणि नंतर कसोटीत आश्चर्यकारक प्रगती केली. तो केवळ एक चांगला गोलंदाजच नाही तर एक उत्तम फलंदाज देखील आहे.” अश्विन जवळजवळ १० वर्षांनी चेन्नई सुपर किंग्जमध्ये परतत आहे. गेल्या वर्षी झालेल्या मेगा लिलावात त्याला चेन्नईने ९.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२५ मध्ये त्यांचा पहिला सामना २३ मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पाहुण्या मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळेल. दोन्ही संघ पाच वेळा आयपीएल चॅम्पियन आहेत. त्यामुळे दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्जने शेवटचे जेतेपद २०२३ मध्ये पटकावले होते, परंतु मुंबईने शेवटचे जेतेपद २०२० मध्ये मिळवले होते. या सामन्याला एल क्लासिको म्हणतात.





