IPL Playoffs Scenario 2024 : राजस्थानला केवळ एका विजयाची गरज, तर ‘या’ संघांना प्लेऑफ गाठणे कठीण….

IPL Playoffs Scenario 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामाची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. आता सर्व संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी लढत आहेत. या लढतीत राजस्थान रॉयल्स (RR) खूप पुढे असल्याचे दिसते. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील हा संघ आता 14 गुणांसह प्लेऑफच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने यंदाच्या मोसमात विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. यंदाच्या मोसमात राजस्थान रॉयल्सने 8 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सला 9 गडी राखून नमवत राजस्थान प्लेऑफच्या जवळ पोहोचला आहे.
आय़पीएलच्या प्लेऑफसाठी पात्र ठरायचे असल्यास किमान 16 गुण आवश्यक आहेत. राजस्थानला आता फक्त एक सामना जिंकावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सचा 8 सामन्यात हा पाचवा पराभव ठरला. यामुळे मुंबईला प्लेऑफ गाठणे कठीण बनले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सची यंदा आतापर्यंतची कामगिरी खूपच सुमार झाली आहे.
मुंबई इंडियन्सला आतापर्यंत केवळ तीनच विजय मिळवता आले असून त्यांचे 6 गुण झाले आहेत. गुणतालिकेत ते सातव्या स्थानी आहेत. मुंबईला प्लेऑफ गाठायची असेल तर उरलेल्या सहा सामन्यात किमान 5 सामने जिंकावेच लागतील. मुंबईला 5 सामन्यात विजय मिळाला नाही तर त्यांना जर तरच्या समीकरणांवर अवलंबून रहावे लागेल.
आयपीएल गुण तालिकेत राजस्थान अव्वल स्थानी आहे. तर टॉप फोरमध्ये कोलकाता नाइट रायडर्स, सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आहेत. या मोसमात विराट कोहलीचा संघ आरसीबीने आतापर्यंत 8 पैकी 7 सामने गमावले आहेत. हा संघ सध्या गुणतालिकेत तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर आहे. पंजाब किंग्जची (पीबीकेएस) अवस्थाही जवळपास आरसीबीसारखीच दिसते.
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जसाठी ही करा किंवा मरो अशी परिस्थिती आहे. हा संघ 8 पैकी 2 सामने जिंकून गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) साठी आता सर्व सामने करा किंवा मरो सारखे आहेत. जर हे संघ 1-2 सामने हरले तर ते बाहेरही होऊ शकतात.


