IPL 2024 (SRH vs RCB Match 41) : सलग 6 पराभवानंतर आरसीबीने केलं जोरदार पुनरागमन; हैदराबादचा केला 35 धावांनी पराभव…

IPL 2024 Live Cricket Score, SRH vs RCB : आज आयपीएल 2024 चा 41 वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा 35 धावांनी पराभव केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाने 20 षटकांत सात गडी गमावून 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला 20 षटकांत 8 गडी गमावून 171 धावा करता आल्या.
गुरुवारी हैदराबादने आरसीबीविरुद्ध आठवा सामना खेळला. या सामन्यात संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. संघ 10 गुण आणि 0.577 निव्वळ रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, आरसीबी चार गुणांसह गुणतालिकेत 10 व्या स्थानावर आहे.
207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात धक्कादायक झाली. फलंदाजीला सलामीला आलेला ट्रॅव्हिस हेड केवळ एक धाव काढून परतला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला विल जॅकने बाद केले. यानंतर अभिषेक शर्मा 31 धावा करून बाद झाला. या सामन्यात शाहबाज अहमदने 40 (नाबाद) आणि पॅट कमिन्सने 31 धावा केल्या. या तीन खेळाडूंशिवाय संघाचा एकही फलंदाज जास्त काळ विकेटवर टिकू शकला नाही. आरसीबीविरुद्ध मार्कराम सात, नितीश 13, क्लासेन 07, अब्दुल समद 10, भुवनेश्वर कुमार 13 आणि उनाडकट 08 (नाबाद) धावा करू शकले.
या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. तर विल जॅक आणि यश दयाल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. सिराज आणि फर्ग्युसन यांना गङी बाद करण्यात अपयश आले.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 गडी गमावून 206 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ही धावसंख्या गाठण्यात विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. एकीकडे विराटने 43 चेंडूत 51 धावांची खेळी केली. तर पाटीदारने 20 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह 50 धावांची तुफानी खेळी केली. या डावात विराट कोहली आणि जयदेव उनाडकट यांच्यातील स्पर्धा पाहण्यासारखी होती. उनाडकटने SRH साठी शानदार गोलंदाजी करत एकूण 3 बळी घेतले.
The ball wasn’t coming on easily towards the later half of our innings and we have an extra spinner tonight!
Let our bowlers lead the charge now. 👊#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #SRHvRCB pic.twitter.com/igcuJjs2n9
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 25, 2024
चौथे षटक संपण्यापूर्वीच विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी संघाची धावसंख्या 48 धावांवर नेल्याने आरसीबीसाठी ही चांगली सुरुवात होती. डु प्लेसिस हा 12 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. त्यानंतर विल जॅक्सही लगेचच माघारी परतला. तो केवळ 6 धावा करून बाद झाला. दरम्यान, विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्यातील 65 धावांच्या भागीदारीने आरसीबीचा डाव सावरला. 15 षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 142 धावा होती, पण येथून कॅमेरून ग्रीनचे वादळ आले. पुढच्या 3 षटकांत सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी 37 धावा दिल्या, त्यामुळे बेंगळुरू संघाने 18 षटकांत 179 धावा केल्या होत्या.
शेवटच्या 2 षटकांमध्येही आरसीबीचे फलंदाज आक्रमकपणे बॅट फिरवताना दिसले. SRH कर्णधार पॅट कमिन्सने पहिल्या 19व्या षटकात 15 धावा दिल्या, तर टी नटराजननेही शेवटच्या षटकात 12 धावा दिल्या. यासह 200 धावांचा टप्पा पार करण्यात आरसीबी संघाला यश आले. ग्रीनने 20 चेंडूत 37 धावा केल्या आणि शेवटच्या षटकांमध्ये स्वप्नील सिंगने 6 चेंडूत 12 धावांची छोटी खेळी खेळली. शेवटच्या 5 षटकात आरसीबीने 64 धावा काढल्या.
उनाडकट गोलंदाजीत चमकला…
सामन्याच्या सुरुवातीला एसआरएचची गोलंदाजी लयबाहेर असल्याचे दिसून आले. पॉवरप्ले षटकांतच संघाने 61 धावा दिल्या होत्या. मात्र, जयदेव उनाडकटची गोलंदाजी धारदार होती, त्याने 4 षटकांत 30 धावांत 3 बळी घेतले. कर्णधार पॅट कमिन्सने 1 बळी घेतला असला तरी त्याने 4 षटकात 55 धावा दिल्या. त्यांच्याशिवाय मयंक मार्कंडेने 1 आणि टी नटराजनने 2 बळी घेतले. शाहबाज अहमद 3 षटकात केवळ 14 धावा देत अतिशय कसून गोलंदाजी करताना दिसला.





