पुणे पोलीस दलात “इन्व्हेस्टिगेटिव्ह’ बाइक दिमतीला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे पोलीस दलात आता इन्व्हेस्टिगेटिव्ह बाइक ( आय-बाइक) उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गुन्हा घडल्यानंतर आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच आरोपीला शिक्षा होण्यासाठी घटनास्थळावरील भौतिक पुरावे गोळा करण्यासाठी बाइक महत्त्वाची ठरणार आहे.
याच धर्तीवर इन्व्हेस्टिगेटिव्ह बाइकचे लोकार्पण पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. त्यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते. नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीला १ जुलैपासून सुरवात झाली आहे.
त्याअनुषंगाने आयुक्तालयांतर्गत घडणाऱ्या गुन्ह्याच्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीमने भेट देणे बंधनकारक आहे. त्यानुसार आता प्रत्येक परिमंडळच्या हद्दीत दोन आय- बाइक उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यावर ४ पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
विशेषतः आय-बाइकवर विज्ञान शाखेचे ज्ञान असलेले पोलीस अंमलदाराने घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून शास्त्रोक्त पद्धतीने भौतिक पुरावे गोळा करणे, जतन करणे व व्यवस्थित सिलबंद करून तपासी अधिकारी यांना तपासासाठी देण्यासाठी सूचित केले आहे.
पोलीस अंमलदारांना मूलभूत प्रशिक्षण देणेसाठी प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, गणेशखिंड येथील रासयनिक विश्लेषक व वैज्ञानिक सहायक यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. घटनास्थळावरील पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स टीमवर निर्भर राहावे लागते.
या बाइकद्वारे तत्काळ घटनास्थळी पोहोचण्याच्या दृष्टीने वापर केला जाणार आहे. यासाठी पोलीस अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. भौतिक पुरावे गोळा करण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २० पोलीस अंमलदारांची परिमंडळनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे.
आयुक्तालयअंतर्गत घडणाऱ्या सात वर्षे व त्यापेक्षा जास्त शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यांच्या ठिकाणी पोहचून संबंधित कर्मचाऱ्यांना काम करावे लागणार आहे. पोलीस अंमलदारांना संबंधीत गुन्ह्यांची व घटनास्थळाची माहिती तत्काळ मिळण्यासाठी १० वॉकीटॉकी/ वायरलेस संच उपलब्ध करण्यात आले आहेत.


