Pune : पुणे पोलीस दलास अत्याधुनिक सर्व्हिलन्स वाहने

पुणे : बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पुणे पोलिसांना अत्याधुनिक यंत्रसामुग्री असलेली पाच वाहने (सर्व्हेलन्स व्हेईकल) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बसमध्ये थर्मल इमेजिंग कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, इन्फ्रारेड सेन्सर यासह विविध अत्याधुनिक यंत्रणा असणार आहे. गंभीर गुन्ह्यांच्या तपासात या वाहनांची मदत होणार आहे. संवेदनशील भागात गस्त, अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तात या वाहनांचा समावेश केला जाणार आहे. सध्या, अशा प्रकारची वाहने बंगळुरू पोलीस दलात आहेत.
ही वाहने खास पोलीस दलासाठी तयार करण्यात आली आहेत. या वाहनांमध्ये घटनास्थळाचे चित्रीकरण करण्याची सुुविधा आहे. शहरातील संवेदनशील भागात अशा प्रकारची वाहने तैनात केली जाणार आहेत. या बसमध्ये असलेले कॅमेरे ३६० अंशात फिरणारे असतील. या वाहनात ड्रोन कॅमेरेही आहेत. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे संवेदनशील भागावर लक्ष ठेवणे शक्य हाेणार आहे. सभा, मोर्चा, आंदोलनाच्या ठिकाणी हे वाहन तैनात केले जाणार आहे. या वाहनातील कॅमेरे त पोलीस नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत.
त्यामुळे आंदोलनांच्या ठिकाणच्या परिस्थितीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त कार्यालयातून लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. संवेदनशील भागात एखादा संशयित आढळून आल्यास त्याची माहिती फेस रेक्गनिजेशन कॅमेऱ्यांद्वारे उपलब्ध होईल, संशयित वाहनांवरील क्रमांक टिपला गेल्यास त्वरीत संबंधित वाहन कोणाच्या मालकीचे आहे, याची माहिती उपलब्ध होणार आहे.अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
किंमत दीड कोटी रुपये …
पुणे पोलीस दलात दाखल होणाऱ्या सर्व्हेलन्स व्हेईकलमधील कॅमेरे अंधारातही काम करतील. दाट झाडीत लपलेल्या संशयिता या वाहनातील कॅमेरे टिपतील. पुणे पोलिसांना शासनाने अशा प्रकारची पाच वाहने उपलब्ध करून दिली आहेत. मार्च महिन्यात एका सर्व्हेलन्स व्हेईकल पुणे पोलीस दलात दाखल होईल. त्यानंतर टप्याटप्याने उर्वरित चार वाहने पोलीस दलात दाखल होतील. एका वाहनाची किंमत साधारणपणे दीड कोटी रुपये असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.





